Mega Block: उद्या लोकलच्या मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक; मुंबईकरांच्या प्रवासाचा होणार खोळंबा

त्यामुळे ब्लॉकदरम्यान लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे.

Photo Credit- X

Mega Block: लोकल मुंबईकरांची लाईफलाईन आहे. मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी लोकल (Mumbai Mega Block)फार महत्त्वाची ठरते. रविवारी मात्र, अनेकांना त्रास सहन करावा लागतो. कारण रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी रेल्वे(Railway) मार्गावर मेगाब्लॉक घेतला जातो. त्यामुळे रविवारी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांनी बातमी वाचूनच बाहेर पडावे. ब्लॉकदरम्यान लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव अप आणि डान धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गाने वळवण्यात येतील. या वेळेत बोरिवली १, २, ३ आणि फलाट क्रमांक ४ वरून कोणतीही लोकल धावणार नाही.

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ मार्गावर मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान, लोकलच्या काही फेऱ्या रद्द तर काही विलंबाने धावतील. जलद मार्गावरील लोकलच्या फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येईल. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अप-डाऊन, ठाणे ते पनवेल अप-डाऊन मार्गावरील लोकल बंद राहतील. ब्लॉक कालवधीत सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते वाशी आणि नेरुळ बेलापूर मार्गावरील लोकल सुरु राहतील.

अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर रेल्वे बंद असतील. तर ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.