Medical Negligence in Thane: ठाण्यात गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणा; 9 वर्षांच्या जखमी मुलाच्या पायाऐवजी केली प्रायव्हेट पार्ट्सवर केली शस्त्रक्रिया, पालकांचा आरोप

त्याला 15 जून रोजी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या जखमी पायाऐवजी त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया केली.

Surgery | Representational image. (Photo Credits: sasint/pixabay)

Medical Negligence in Thane: महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शहापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी निष्काळजीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या ठिकाणी पायाला दुखापत झाल्याने एक नऊ वर्षांच्या मुलाला दाखल करण्यात आले होते, मात्र सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या पायाऐवजी गुप्तांगावर (Private Part) शस्त्रक्रिया केली. मुलाच्या पालकांनी हा गंभीर आरोप केला आहे. याबाबत पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या गंभीर आरोपानंतर आरोग्य अधिकाऱ्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच पोलीसदेखील याचा तपास करत असल्याचे सांगितले.

अहवालानुसार, या अल्पवयीन मुलाच्या पालकांनी सांगितले की, 'गेल्या महिन्यात मित्रांसोबत खेळताना मुलाच्या पायाला दुखापत झाली. त्याला 15 जून रोजी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या जखमी पायाऐवजी त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया केली. मुलाच्या आईने ऑपरेशनचे ठिकाण पाहिले तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. यावर मुलाच्या आईने आक्षेप घेतला. त्यानंतर डॉक्टरांनी मुलाला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेले आणि त्याच्या पायावर पुन्हा शस्त्रक्रिया केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पीडितेच्या वडिलांनी रुग्णालय प्रशासनाकडे मदत मागितली.

त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पालकांनी शहापूर पोलिसांकडे केली. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी, या तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मुलाच्या पालकांचा दावा आहे की, त्याला कोणतीही समस्या नसताना त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच त्यांना न सांगता हे ऑपरेशन केले गेले. या आरोपांची चौकशी आरोग्य अधिकारी करणार असल्याचे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ.कैलास पवार यांनी सांगितले. (हेही वाचा: Mumbai: राज्यात कॉलेज, पब आणि इतर ठिकाणी ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल; एकनाथ शिंदे यांची ग्वाही)

यासह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गजेंद्र पवार यांनी सांगितले की, पायाच्या दुखापतीव्यतिरिक्त मुलाला फिमोसिस (टाईट फोरस्किन) ही समस्या देखील होती. त्यामुळे त्यांना दोन ऑपरेशन करावे लागले. पालकांना दुसऱ्या ऑपरेशनची माहिती देण्यास डॉक्टर विसरले असावेत किंवा रुग्णाच्या इतर नातेवाईकांना त्याबाबत सांगितले असावे, असे पवार म्हणाले. डॉक्टरांनी जे केले ते योग्यच होते आणि त्यात चुकीचे काही नव्हते. मात्र, पालकांनी डॉक्टरांनी दिलेला खुलासा मान्य करण्यास नकार दिला.