Medical Negligence Case in Mumbai: मज्जासंस्थेचा कॅन्सर असलेल्या रूग्णावर कुष्ठरोगाचे उपचार; आजार बळावत गेल्याने समोर आला प्रकार

मुंबईच्या जसलोक रूग्णालयामध्ये त्याला दाखल केल्यानंतर बायोप्सी मध्ये विशिष्ट प्रकारच्या रक्तपेशींमुळे एका प्रकारचा ट्यूमर झाल्याचे दिसून आले.

Representational Image (Photo Credit: PTI)

आजाराचं योग्य निदान हे रूग्णाच्या रिकव्हरी मध्ये आवश्यक आहे. पायांना जळजळ होत असल्यावरून एका रूग्णाला कॅन्सर (Cancer) ऐवजी कुष्ठरोगाचे (Leprosy) उपचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या रूग्णाला दुर्मिळ मज्जासंस्थेचा कॅन्सर (Cancer Of Nervous System) झाला होता, मात्र चाचण्यांमध्ये त्याचे योग्य निदान न झाल्याने त्यांच्यावर कुष्ठरोगाचे उपचार झाले आहेत. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर त्या रुग्णाला जसलोस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं मटाच्या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे.

रूग्णाची लक्षणा न पाहता, कॅन्सरच्या शक्यतेचा विचारही न करता खाजगी डॉक्टारांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. परिणामी दोन्ही पायांमधिल जळजळ वाढून ती हातापायांमध्ये पसरली. त्या रुग्णाला उभे राहणेही कठीण होऊ लागले. चालताना त्यांचा तोल जाऊ लागला. रोजची लहान सहान कामं देखील तो करू शकत नव्हता. पुढे अधिक चाचण्या केल्यानंतर रुग्णाच्या शरीरात प्रोटीन तसेच थ्रोम्बोसायटोसिस, क्रिएटिनिन पातळीमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं. नसांच्या वैद्यकीय तपासण्यांमधून मज्जातंतूशी संदर्भातील आजाराचे निदान झाले. पीईटी स्कॅन केले तेव्हा नितंबाच्या भागात अनपेक्षित वाढ दिसून आली. (हेही वाचा: Aapla Dawakhana: राज्यात लवकरच 700 ठिकाणी सुरु होणार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना; निधी मंजूर, लाभार्थ्यांना मोफत मिळणार आरोग्य सेवा).

मुंबईच्या जसलोक रूग्णालयामध्ये त्याला दाखल केल्यानंतर बायोप्सी मध्ये विशिष्ट प्रकारच्या रक्तपेशींमुळे एका प्रकारचा ट्यूमर झाल्याचे दिसून आले. या ट्यूमरमुळे रक्तातील विशिष्ट प्रोटीनमध्ये असामान्य वाढ होऊन त्याचा परिणाम मज्जातंतूवर झाला होता. हा दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर आहे. या प्रकारच्या ट्यूमरचे व्यवस्थापन करणे, प्रोटीनच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढे उपचार सुरू झाले.

‘कोणत्याही मज्जासंस्थेसंदर्भात आजाराला हाताळण्यासाठी त्याच्या लक्षणांवर योग्य उपचारांचीही गरज असते' असे न्यूरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. जॉय देसाई यांनी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना सांगितले.