Marathwada Water Storage: जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ; मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटणार?

जून आणि जुलै महिन्यात मोठे पाऊस झाले नसल्याने जायकवाडी धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होऊन 26.50 टक्क्यांवर आली होती.

Jyakwadi Dam

जुलै महिन्यात राज्यासह देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने 4 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी गेल्या तीन दिवसात 26.50 टक्क्यांहून 32.04 टक्क्यांवर गेली आहे.  (हेही वाचा - Mumbai Water Storage: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मध्य वैतरणा तलाव 90 टक्के भरला)

जून आणि जुलै महिन्यात मोठे पाऊस झाले नसल्याने जायकवाडी धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होऊन 26.50 टक्क्यांवर आली होती. मात्र, आता हळूहळू पाऊस वाढल्याने धरणात आवक सुरू झाली आहे. मागच्या वर्षी आजघडीला 90.29 टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र यंदाच्या मान्सूनात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जून कोरडा गेल्यानंतर जुलैमध्येही दमदार पावसाची हजेरी लागलेली नाही.

त्यामुळे जुलैअखेरपर्यंत जायकवाडी धरणाची पाणीपातळी 30 टक्क्यांच्या आतच राहिली. परंतु, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग पावसाची संततधार सुरूच राहिल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.