Marathi Woman Denied House in Mulund: मुजोरांना अटक, मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारणाऱ्या गुजराती पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर अशी आरोपींची नावे आहेत.
Marathi Manoos News: मुंबई (Mumbai) पूर्वेकडील उपनगर असलेल्या मुलुंड (Mulund) येथे केवळ मराठी आहे म्हणून एका महिलेला जागा नाकारणाऱ्या गुजराती पिता-पुत्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर अशी आरोपींची नावे आहेत. तृप्ती देवरुखकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. देवरुखकर यांना घर नाकारताना वापरलेली भाषा आणि त्यांच्याशी करण्यात आलेले वर्तन याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उडाली. स्वत: देवरुखकर यांनीही प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर येऊन त्यांच्यासोबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर मराठी जनांमध्ये संतापाची एकच लाट निर्माण झाली.
तक्रारदार तृप्ती देवरुखकर या मुंलुंड पश्चिम येथे आपल्या कार्यालयासाठी जागा शोधत होत्या. दरम्यान त्यांना एका सोसायटीमध्ये जागा असल्याचे पाहायला मिळाले. या वेळी त्या तिथे पोहोचल्या असता ठक्कर पीता-पुत्रांनी त्यांना त्या केवळ मराठी माणूस आहेत म्हणून घर नाकारले. इतकेच नव्हे तर तुम्हाला काय करायचे आहे ते करा, तुम्हाला घर देणार नाही, असे सांगत उद्दाम भाषा वापरली. या घटनेचा व्हिडिओ तृप्ती देवरुखकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
दरम्यान, सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर पीडित महिलेने (देवरुखकर) दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात भादंसं त कलम 341, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे.
ट्विट
दरम्यान, या प्रकारानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन ठक्कर पिता पुत्रांना धडा शिकवला. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. ''"केम छो वरळी "होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच ह्या लोकांना एवढा माज आणि हिम्मत आली आहे की महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हटतात ह्यांचा माज उतरवल्या शिवाय राहणार नाही जय मनसे जय राज साहेब.''