Marathi Woman Denied House in Mulund: मराठी जनांच्या रेट्यानंतर मुलुंडमधील सोसायटीची नांगी, इंग्रजीतील फलक राज्य भाषेत
मात्र, या घटनेमुळे मुंबई आणि सबंध महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला.
Marathi Language: केवळ मराठी आहे म्हणून महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारणाऱ्या सोसायटी आणि पिता-पूत्रांविरोधात कायदेशीर कारवाई झाली. मात्र, या घटनेमुळे मुंबई आणि सबंध महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, आता मराठी मुद्द्यावर सर्वत्र आग्रह धरला जात आहे. याचाच एक भाग म्हणून मराठी महिलेला घर नाकारणाऱ्या सोसायटीचा बोर्ड मराठीत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार सोसायटीने आता आवश्यक तो बदल करत वसाहतीचा फलक मराठीमध्ये (Shiv Sadan Society in Mulund) केला आहे. सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड यांनी याबाबत मागणी केली होती. त्यानंतर हा बदल झाला आहे.
तृप्ती देवरुखकर (Trupti Deorukhkar) यांना केवळ मराठी असल्याच्या कारणावरुन मुलुंड येथे घर नाकारण्यात आले होते. त्यांच्याशी असभ्य वर्तन करणारा सासायटी सेक्रेटरी हा गुजराती असल्याचे सांगण्यात येत होते. सेक्रेटरी आणि त्याच्या पुत्राने देवरुखकर यांना घर नाकारले होते. त्यानंतर सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटली. मनसे कार्यकर्त्यांनी या दोघांचा शोध घेऊन त्यांना माफी मागायला लावली. तसेच, पोलिसांनीही दखल घेत कलम 341, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. (हेही वाचा, Marathi Woman Denied House in Mulund: मुजोरांना अटक, मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारणाऱ्या गुजराती पिता-पुत्रावर गुन्हा दाखल)
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये मुद्दाम गुजराती भाषेत सदनिकांचे बोल्ड लावले जातात. इतकेच नव्हे तर कारणाशिवाय मराठी माणसाला त्रास दिला जातो. म्हणूनच त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. सर्वांनी मराठीसाठी आग्रह धरला पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने त्यासाठी जागृक असायला पाहिजे, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड यांनी व्यक्त केली.
दरम्यान, तृप्ती देवरुखकर यांना आपण स्वत: कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देऊ असे अश्वासन स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी दिले आहे. तर , या घटनेनंतर इतरही अनेक ठिकाणाहून आम्हाला फोन येत आहेत. मराठी माणसाला त्रास दिल्याच्या घटना घडत आहेत. त्यावर लवकरच कारवाई केली जाईल, असे मनसेने म्हटले आहे.