Marathi Dandiya Event: भाजपकडून मुंबईमधील काळाचौकी येथे 7 दिवसांच्या भव्य मराठी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन; दररोज गिफ्ट म्हणून मिळणार आयफोन, जाणून घ्या सविस्तर

यासाठी सहभागींचा पारंपारिक मराठी पोशाख आणि नृत्य या दोन्ही बाबी लक्षात घेतल्या जातील.

Garba and Dandiya (Photo Credits: Facebook, PTI)

Marathi Dandiya Event: आजपासून देशभरात शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2024) सुरुवात होत आहे. नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्वात सण आहे. या दिवसांमध्ये नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव गरबा आणि दांडिया खेळून साजरा केला जातो. रास किंवा दांडिया रास हे सामाजिक-धार्मिक लोकनृत्य आहे. हल्ली मुंबईसह अनेक शहरांमध्ये मोठ्या गरबा आणि दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठी मतदारांशी जोडण्याच्या धोरणात्मक प्रयत्नात, भाजप काळाचौकी येथील अभ्युदय नगर येथे भव्य मराठी दांडिया (Marathi Dandiya) कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.

कार्यक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. मागील दोन वर्षात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. बुधवारी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मिहीर कोटेचा, महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. या वर्षीचा कार्यक्रम मागील पाच दिवसांच्या स्वरूपाऐवजी सात दिवसांचा असेल.

या कार्यक्रमातील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाजप एक पुरुष आणि एका महिलेला दररोज एक आयफोन गिफ्ट करणार आहे. यासाठी सहभागींचा पारंपारिक मराठी पोशाख आणि नृत्य या दोन्ही बाबी लक्षात घेतल्या जातील. यामध्ये ड्रॉ झाल्यास, दोन्ही सहभागींना आयफोन मिळेल. ‘हिंदू संस्कृतीचे कौतुक करणाऱ्यांना’ कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. प्रवेशपत्रे मध्य आणि दक्षिण मुंबईतील भाजप कार्यालयात उपलब्ध आहेत. कार्ड मिळविण्यासाठी ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Ghatasthapana 2024 HD Images: घटस्थापना आणि नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा,Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन जल्लोषात करा नवरात्रीची सुरूवात)

चित्रपट आणि दूरचित्रवाणी कलाकारांच्या सादरीकरणासह उत्कृष्ठ वाद्यवृंदाने भरलेल्या उत्साही वातावरणाचे आश्वासन देत, वाघ यांनी लोकांना उत्सवात सामील होण्यासाठी आमंत्रित केले. दरम्यान, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि त्यानंतर संपूर्ण 9 दिवस दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. यावर्षी नवरात्रीचा उत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तो 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.