Marathi Bhasha Bhavan: मराठी भाषेवर बोलण्यापेक्षा मराठीत बोला, दररोजच्या टीकेला मी किंमत देत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला
तशाच पद्धतीचे मुंबई येथे होणारे मराठी भाषा भवन असायला हवे. जगभरातील पर्यटक येथे आले पाहिजेत. जगातील प्रत्येक नागरिकांला इथे आल्यावर मराठी भाषा, भाषेचे वैभव, भाषेची समृद्धी, श्रीमंती कळली पाहिजे, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी व्यक्त केली आहे.
आपण जे करतो ते जगात सर्वोत्तम असायला हवे. तशाच पद्धतीचे मुंबई येथे होणारे मराठी भाषा भवन असायला हवे. जगभरातील पर्यटक येथे आले पाहिजेत. जगातील प्रत्येक नागरिकांला इथे आल्यावर मराठी भाषा, भाषेचे वैभव, भाषेची समृद्धी, श्रीमंती कळली पाहिजे, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी व्यक्त केली आहे. काम करत असताना टीका होते. अशा दररोज होणाऱ्या टीकेला मी किंमत देत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे 'मराठी भाषा भवन' (Marathi Bhasha Bhavan) इमारतीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मराठी भाषेवर बोलण्यापेक्षा मराठी भाषेत बोलायला हवे. त्यासोबत आपल्यावर ही वेळ का आली यावरही विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. आमच्यावर टीका होते तुमची मुले इंग्रजी शाळांमध्ये शिकतात. होय, शिकतात. पण असे असले तरी आम्ही आमचे मराठीपण सोडले नाही. आजही आई, बाबाच म्हटले जाते. मॉम, डॅड नव्हे. मला दुसऱ्या भाषेचा द्वेश मुळीच नाही. पण आपल्याच राज्यात मराठीची सक्ती करण्यासाठी कायदा करावा लागतो आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray: आम्ही सर्व एकत्रच, महाराष्ट्राला बदनाम करु नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशाणा)
दरम्यान, आज मला भाग्य लाभले आहे. मला किती जन्माचे भाग्य लागले याचा हिशोब मी इथे मांडणार नाही. परंतू, मराठी भाषा, मुंबईसाठी लढा देणारे माझे आजोबा. पुढे मुंबईसाठी आवाज बुलंद करणारे माझे वडील बाळासाहेब ठाकरे. खरे तर तेव्हा शिवसेना नव्हती. परंतू, बाळासाहेब तेव्हा व्यंगचित्रांच्या माध्यमातून या लढ्यात सहभागी होते. माझ्या आजोबांचा नातू आणि शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून माझ्या नावापुढे मुख्यमंत्री लागले. त्याच कार्यकाळात 'मराठी भाषा भवन' इमारतीचे उद्घाटन झाले. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. याच्यासारखे आयुष्यातील दुसरे सार्थक ते मोठे कोणते असेल, असे भावोद्गारही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी काढले.
महाराष्ट्राला संघर्ष नवा नाही. मुंबई हिसुद्धा संघर्ष करुनच मिळाली आहे. देशात जेव्हा भाषावरा प्रांतरचना झाली तेव्हा मुंबई ही महाराष्ट्राला सहज मिळाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र म्हटले की, मराठी माणसाचा संघर्ष हा आलाच, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.