Maratha Kranti Morcha Protest In Maharashtra: मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; रावसाहेब दानवे, अमित देशमुख यांच्या घराबाहेर आंदोलन
यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पासून ठाकरे सरकार मधील अनेक नेत्यांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला यंदाच्या वर्षासाठी स्थगिती दिल्याचं सांगितल्यानंतर आता राज्यातील काही मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान आज मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) कडून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या पासून ठाकरे सरकार मधील अनेक नेत्यांचा समावेश आहे. अमित देशमुख (Amit Deshmukh), राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या समोर मराठा समाजातील संघटनांनी आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करत आंदोलनं सुरू केली आहेत. Maratha Reservation: जातीय सलोखा कायम राखत मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावा, दुजाभाव नको; ओबीसी नेत्यांची राज्य सरकारकडे मागणी.
अमित देशमुख यांच्या घराबाहेर तसेच पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं आहे. जालना मध्येही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत काहींनी त्यांचा रस्ता अडवला मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजुला केले आहे. दरम्यान मराठवाड्यातही आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी घुसून पालकमंत्र्यांचा निषेध करण्यात आला आहे. नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्याजवळ बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात तीव्र होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे यंदाच्या नोकरभरती आणि शिक्षणामध्ये मराठा तरूणांचं नुकसान होऊ नये म्हणून अध्यादेश काढा अशी मराठा क्रांती मोर्चाची ,मागणी आहे. मात्र ठाकरे सराकार कायदेशीर बाबींची चाचपणी करत आहे. अध्यादेश किंवा फेर विचार याचिका पेक्षा इतर काही मार्गांचा महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. त्याबाबतचा निर्णय आज किंवा उद्या पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो.
आज मराठा समाजाकडून मुंबई, पुणे, नाशिक कडे जाणारा दूध पुरवठा देखील रोखण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान कालच मुंबईमध्ये मराठा आरक्षण बद्दल सर्वपक्षीय बैठक झाली असून सार्यांच्या सूचना लक्षात घेत विरोधक आणि सत्ताधारी पक्ष या प्रकरणात सुवर्णमध्य काढण्याचाप्रयत्न करणार आहेत.