मराठा संवाद यात्रेपूर्वी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू, पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक मंदावली
मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज महाराष्ट्रभरात मराठा संवाद यात्रेचं ( Maratha Samvad Yatra ) आयोजन करण्यात आलं आहे.
मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज महाराष्ट्रभरात मराठा संवाद यात्रेचं ( Maratha Samvad Yatra ) आयोजन करण्यात आलं आहे. सध्या मुंबईत सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान मोर्चेकरांनी आज विधानसभेवर मोर्चा घेऊन धडकण्याचा प्लॅन आखला होता. मात्र मुंबईसह महाराष्ट्र भरात पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. मुंबईमध्ये माऊली पवार, संजीव भोर व अंकुश कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर ठाण्याचे समन्वयक इंद्रजित निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलिसांनी पाळत ठेवली आहे.
महाराष्ट्रभरातून मुंबईत येणार्या कार्यकर्त्यांच्या गाड्याही अडवण्यात आल्या आहेत. सायन पनवेल पूर्व द्रुतगती (Eastern Express Highway) महामार्गावर वाशी टोलनाक्यावर अडवले जात आहे. दक्षिण मुंबईत वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून गाड्या थांबवण्यात आल्या आहे. मात्र गाड्यांऐवजी रेल्वे किंवा इतर वाहनांच्या मदतीने मुंबईकडे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतुक मंदावली आहे. मराठा आरक्षण विधेयक सरकार 28 नोव्हेंबरला विधानसभेत मांडणार
मराठा क्रांती मोर्चाने आज मराठा संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकार सकारात्मक वाटत असले तरीही आश्वासनांची पूर्तता होईल का? याबाबत मराठा समाज संभ्रमात आहेत. आझाद मैदानातून विधानसभेवर मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा घेऊन जाणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.