Manoj Jarange Patil News: 'पाणी पितो पण दोनच दिवस'; मनोज जरांगे पाटील यांच्याकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या विनंतीस मान

या भेटीमध्ये महाराजांनी जरांगे यांना पाणी ग्रहण करण्याचे अवाहन केले. यावर जरांगे यांनीही महाराजांच्या विनंतीचा मान राखत दोन दिवस पाणी पिण्याचे मान्य केले.

Manoj Jarange | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Shahu Maharaj Chhatrapati Meet Manoj Jarange: श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज (31 ऑक्टोबर) मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये महाराजांनी जरांगे यांना पाणी ग्रहण करण्याचे अवाहन केले. यावर जरांगे यांनीही महाराजांच्या विनंतीचा मान राखत दोन दिवस पाणी पिण्याचे मान्य केले. ते म्हणाले, 'ठिक आहे.. तुम्ही आलात, आम्हाला बळ मिळालं. आपल्या विनंतीचा मान ठेऊन मी दोन दिवस पाणी पितो. मात्र, दोन दिवसांमध्ये जर आरक्षण मिळाले नाही तर मग पुन्हा पाणी बंद करणार.' यावर महाराजांनीही त्यांना सांगितले, आपण समाजासाठी महत्त्वाचे आहात. सरकारला आपली मागणी मान्य करावी लागेल. दरम्यान, समाजाकडूनही जरांगे यांना पाणी पिण्याची मागणी केली जात आहे.

समाजाने जरांगे यांच्यासोबत राहावे- श्रीमंत शाहू छत्रपती

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी यांनी उपोषण स्थळावरुन जरांगे यांच्यासी संवाद साधताना म्हटले, आपली मागणी रास्त आहे. आपण योग्य भूमिका घेतली आहे. मात्र, आपण समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहात. त्यामुळे प्रकृतिचीही काळजी घ्या. सरकारला आपली मागणी मान्य करावी लागेल. सर्व समाजानेही पाटील यांच्यासोबत राहायला हवे, अशी भावना जरंगे यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, Manoj Jarange: मनोज जरांगे आक्रमक; संशय व्यक्त करतानाच समाजालाही इशारा, म्हणाले 'हे थांबवा नाहीतर..!')

आपल्या भेटीने आम्हाला बळ आले- मनोज जरांगे

आपल्या विनंतीचा मी सन्मान करतो. त्यानुसार पुढचे दोन दिवस पाणी पितो. पण सरकारने आरक्षण द्यावे. अन्यथा दोन दिवसानंतर पुन्हा पाणी बंद करणार. आपण आम्हास भेट दिलीत. आम्हाला बळ मिलाले, अशी आपुलकीची भावनाही जरांगे यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांबद्दल व्यक्त केली.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत समाज आणि वैद्यकीय क्षेत्रातील जाणारांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. एखादा व्यक्ती अन्न पाणी न घेता 21 दिवस जीवंत राहू शकतो असे सांगितले जाते. मात्र, असे असले तरी ही बाब व्यक्तीपरत्वे भिन्न राहते. त्यामुळे शरीराला अन्न पाण्याच्या रुपात उर्जा मिळाली नाही तर त्याचा शरीरावर दुरगामी परिणाम होऊ शकतो. यात प्रामुख्याने शरीरातील रक्त घट्ट होणे. रक्तदाब वाढणे, काही प्रमाणात शरीराचा एखादा अवयसुद्धा निकामी होऊ शकतो, असे परिणाम होऊ शकतो. काही प्रमाणामध्ये सदर व्यक्तीस हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे जरांगे पाटील यांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी, वैद्यकीय उपचारांना परवानगी द्यावी. पाणी ग्रहण करावे, अशी मागणी होत आहे.