IPL Auction 2025 Live

मुंबई: भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेचा आज लोकार्पण सोहळा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती

मुंबई पोर्ट ट्रस्टने 31 कोटी रुपये खर्च करुन रो पॅक्स सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.

Mandwa Ro Ro Service (Photo Credits: Wikimedia Commons)

गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. बहुप्रतिक्षित अशा या रो रो सेवेची चाचणी देखील यशस्वी झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय नौकावहन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मांडवा येथे या रो रो सेवेच्या रो पॅक्स टर्मिनलचे उद्घाटन केले जाईल .

भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेमुळे मुंबई त अलिबाग प्रवास अवघ्या पाऊण तासात करता येणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने 31 कोटी रुपये खर्च करुन रो पॅक्स सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. येत्या 3 महिन्यात मुंबई-अलिबाग रो-रो सेवा सुरु होणार

या रो रो सेवेची तयारी पूर्ण झाली असून ग्रीसहून आणलेल्या जहाजाची चाचणीदेखील यशस्वी झाली आहे. त्यामुळे आज लोकापर्ण सोहळा पार पडल्यानंतर ही बोट सुरु करण्यात येणार आहे. या जहाजामध्ये एकाचवेळी 1000 प्रवासी आणि 200 गाड्या वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच भाऊचा धक्का ते मांडवापर्यंतचा प्रवास केवळ 45 ते 1 तासात पूर्ण होणार आहे.

तसेच या सेवेमुळे आणि आधुनिक जहाजामुळे कार्बन उत्सर्जन आणि रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होईल.

कालांतराने रो-रो सेवा विस्तारणार

रो-रो सेवेचा फायदा मांडवा, अलिबाग, मुरुड-जंजिंरा, वेलास, श्रीवर्धन या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होईल. सध्या ही सेवा मुंबई पोर्ट ट्रस्ट (MbPt) ते मांडवा/ दिघीपर्यंत सुरु करण्यात येईल. कालांतरानने या सेवेला विस्तारीत रुप देण्यात येईल. त्यानंतर ही सेवा नेरुळ आणि नवी मुंबईचे पनवेल-बेलापूर दरम्यान होणारे विमानतळापर्यंत वाढवण्यात येईल.