Janshatabdi Express Accident: मनमाड स्थानकांत जनशताब्दी सुरू झाली आणि कपलिंगंच तुटलं; मोठा अपघात सुदैवाने टळला

सव्वा तासाच्या दुरूस्तीनंतर मनमाड स्थानकातून जनशताब्दी एक्सप्रेस हलली असल्याचं मनमाड रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

मनमाड जंक्शन । PC: विकीपीडीया

मनमाड रेल्वे स्थानकामध्ये (Manmad Railway Station) आज जनशताब्दी एक्सप्रेसचं (Janshatabdi Express) रेल्वे इंजिनचं कपलिंग तुटल्याने अर्धी गाडी पुढे आणि अर्धी गाडी मागेच राहिल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक रेल्वे प्रशासनाने वेळीच ही घटना पाहून गाडी थांबवली आणि पुढे होणारा मोठा अनर्थ टाळला. दरम्यान या घटनेमुळे मनमाड-मुंबई मार्गावरील आज सार्‍याच गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे.

जनशताब्दी एक्सप्रेस सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे जालना रेल्वे स्थानकातून सुटली. त्यानंतर मुंबईकडे जात असताना मनमाड रेल्वे स्थानकांत हा प्रकार घडला. मनमाड रेल्वे स्थानकांत गाडी आल्यानंतर गाडीचे डबे जोडणारे कपलिंग तुटलं. त्यानंतर दोन्ही बाजूचे डब्बे वेगळे झाले.काही अंतर गाडी पुढे गेल्यानंतर स्थानिक प्रशासाने हा प्रकार बघितला. त्यांनी गाडी थांबवून तातडीने देखभाल, दुरूस्ती पथकाला बोलावलं. कपलिंग तुटल्याने सुमारे सव्वा तास गाडी स्थानकामध्येच उभी होती.

जनशताब्दी एक्सप्रेसच्या या गोंधळामुळे नाशिक मार्गे मुंबईकडे जाणार्‍या मागील सार्‍याच गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. सध्या सुट्ट्यांच्या काळ आहे. नाशिक मध्ये पुढील काही दिवस मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे अशातच हा प्रकार घडल्याने अनेकांच्या प्लॅन्सचा आज विचका झाला आहे. नक्की वाचा: Shocking ! ट्रेनची जोरदार धडक बसूनही व्यक्ती बचावला, बाईकचा मात्र चुराडा, पाहा व्हिडीओ .

कपलिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई कडे रवाना करण्यात आली आहे. सव्वा तासाच्या दुरूस्तीनंतर मनमाड स्थानकातून जनशताब्दी एक्सप्रेस हलली असल्याचं मनमाड रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.