पश्चिम महाराष्ट्रातील वीज बिल न भरणाऱ्या तब्बल 14 लाखांहून अधिक ग्राहकांना झटका; विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा महाविरणाचा इशारा
1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबील न भरणाऱ्या तब्बल 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांना पुणे प्रादेशिक संचालकांनी तंबी दिली आहे.
वीजबील न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. 1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबील (Electricity Bill) न भरणाऱ्या तब्बल 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांना पुणे प्रादेशिक संचालकांनी तंबी दिली आहे. पुढील 3 आठवड्यात बील थकबाकी चुकती न केल्यास वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक या तिन्ही वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. त्यामुळे बाकी असलेले वीजबील भरुन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसंच वीजबील भरण्यासाठी हप्त्यांची देखील सोय करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीजबिलांच्या थकबाकीसह इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी हे आदेश दिले. वारंवार संपर्क करुनही ग्राहकांनी वीज थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना तीन आठवड्यांची मूदत देण्यात आली आहे. यादरम्यानही बील न भरल्यास वीजपुरवठा खंडीत करण्याची कटू कारवाई करण्यात येईल, असा इशारा नाळे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे या कारवाईसाठी पथके तयार करण्यात येणार असून आवश्यक संख्येत कर्मचारी उपलब्ध करुन देण्यासाठी इतर कार्यालयांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा या पथकांमध्ये समावेश करण्याच्या सूचना त्यांनी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (1032.80 कोटी), सातारा (140.36 कोटी), सोलापूर (259.12 कोटी), सांगली (192.54 कोटी) व कोल्हापूर (337.43 कोटी) जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण 1962 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक 12 लाख 68 हजार 487 असून त्यांच्याकडे 856 कोटी 81 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 1 लाख 38 हजार 870 वाणिज्यिक ग्राहकांकडे 264 कोटी 32 लाख आणि 22 हजार 454 औद्योगिक ग्राहकांकडे 126 कोटी 35 लाखांची थकबाकी आहे.