महाशिवरात्री निमित्त जेजुरीत 10 ते 12 मार्चपर्यंत जमावबंदी; कोकणातील कुणकेश्वर मंदिरही बंद
याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादले जात आहे. दरम्यान, महाशिवरात्री निमित्त जेजुरी येथे 10-12 मार्च दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोनाचं (Coronavirus) सावट गडद होऊ लागल्याने पुन्हा एकदा प्रशासन सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादले जात आहे. दरम्यान, महाशिवरात्री निमित्त जेजुरी येथे 10-12 मार्च दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसंच मंदिरातही भाविकांना प्रवेश नाकारला आहे. महाशिवरात्री निमित्त जेजुरी (Jejuri) गडावर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता बुधवार 10 मार्च ते शुक्रवार 12 मार्च पर्यंत जेजुरीत कलम 144 लागू करण्यात आले आहे.
जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसंच हॉटेल, लॉजमध्ये मुक्कामी बुकींग न देण्याचे आदेश मालकांना देण्यात आले आहेत. जेजुरीती सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणूकांवरही बंदी घालण्यात आली आहे. (महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांनी आर्वजून कराव्या काही महत्त्वाच्या गोष्टी)
दरम्यान, कोकणातील कुणकेश्वर मंदिरही महाशिवरात्री पासून 3 दिवस बंद राहणार आहे. 10 ते 14 मार्चपर्यंत कुणकेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय कुणकेश्वर देवस्थान समितीने घेतला आहे. त्याचबरोबर कलम 144 जमावबंदी लागू करण्यात आले आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाशिवरात्री उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
महाशिवरात्री निमित्त कुणकेश्वर मंदिरात तीन दिवस यात्रा असते. यासाठी सुमारे 10-12 लाख भाविक येतात. परंतु, यंदा कोरोना संकटामुळे कुणकेश्वर यात्रेला भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. केवळ पुजारी, देवस्थान ट्रस्ट, मानकरी यांच्या उपस्थितीत यात्रा पार पडणार आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक ठिकाणी होणारा महाशिवरात्रीचा उत्सवही रद्द करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी साध्या पद्धतीने महाशिवरात्रीचा उत्सव पार पडणार आहे.