Delta Plus Variant: मुंबई सह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 निर्बंध; पहा काय सुरु आणि बंद?

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात डेल्टा वेरिएंटचे अधिक रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.

Lockdown | (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असताना डेल्टा प्लस (Delta Plus) या नव्या कोरोना वेरिएंटने डोके वर काढले. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात (Maharashtra) डेल्टा वेरिएंटचे अधिक रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली. या प्रक्रियेत 5 टप्प्यात निर्बंध शिथिल करण्यात येत होते.  पॉझिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार हे टप्पे ठरवण्यात आले होते. यानुसारच मुंबईसह राज्यातील सर्व जिल्हे अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. (Delta Plus COVID19 Variant च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र अनलॉकच्या नियमांमध्ये बदल; सारे जिल्हे लेव्हल 3 वर राहतील)

राज्यात डेल्टा प्लस वेरिएंटचे 21 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी रत्नागिरी मध्ये 9, जळगाव मध्ये 7, मुंबई मध्ये 2 आणि पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग येथे प्रत्येकी 1 रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. डेल्टा प्लस संक्रमित एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घेऊया...

तिसऱ्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यात काय सुरु राहणार काय बंद?

# अत्यावश्यक सेवांची दुकाने सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील.

# अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने आणि आस्थापने शनिवार-रविवार सोडून इतर दिवशी दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील.

# हॉटेल, रेस्टॉरन्ट्स शनिवार-रविवार वगळता 50 टक्के क्षमतेच्या आधारावर दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील.

# शनिवार-रविवारी हॉटेल, रेस्टॉरन्ट्सला होम डिलिव्हरी, पार्सल सेवेसाठी मुभा देण्यात आली आहे.

# जिम आणि सलोन्स 50 टक्के क्षमतेच्या आधारावर दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील.

# खाजगी कार्यालयांना दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने काम करण्यास मुभा देण्यात आली आहे.

# अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सेवक यांच्यासाठी लोकल सेवा सुरु राहील.

# सार्वजनिक बससेवा पूर्ण क्षमतेने सुरु राहील. मात्र कोणत्याही प्रवाशाला उभे राहून प्रवासाची मुभा नसेल.

# मॉल्स, थिएटर्स, मल्टीप्लेक्स पूर्णपणे बंद राहतील.

# ई-कॉर्मर्स सेवा सुरु राहतील.

# शाळा, महाविद्यालयं आणि कोचिंग क्लासेस बंद राहतील.

# लग्नसोहळ्यासाठी 50 लोक तर अंत्यविधीसाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल.

# 50 टक्के लोकांच्या क्षमतेने सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास शनिवार-रविवार वगळता इतर दिवशी परवानगी.

# स्पोर्ट्साठी सकाळी 5-9 आणि संध्याकाळी 6-9 या वेळेत सर्व दिवशी परवानगी.

# बांधकाम सुरु असलेल्या साईट्स, कर्मचारी यांना कामाची मुभा देण्यात आली आहे. मात्र इतर व्यक्तींनी दुपारी 4 नंतर साईट्सवरुन निघणे गरजेचे आहे.

# बायो-बबल च्या आधारे सिनेमांच्या शूटिंगला परवानगी.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेत राज्यात 50 लाख रुग्णांना संसर्ग होण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे. त्यापैकी 8 लाख लोकांना हॉस्पिटलची गरज भासणार आहे. त्याचबरोबर एकूण संसर्ग झालेल्यांपैकी 10 टक्के म्हणजेच 5 लाख रुग्ण लहान मुलं असणार असल्याचेही ते म्हणाले.