Maharashtra Weather Update: 1-2 नोव्हेंबरला राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मात्र दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा राज्यात पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Rain | Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

देशातून मान्सूनने (Monsoon) माघार घेतल्यानंतर राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा राज्यात पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असल्याने 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात 1-2 नोव्हेंबर रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सोमवार, 1 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला असून याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, सोलापूर आणि पुण्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

मंगळवार, 2 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच पुणे, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

K S Hosalikar Tweet:

4-10 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण-पूर्ण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ते जास्त तीव्र न होता पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परिणामी  दक्षिण भारतात पाऊस सक्रीय होईल. तर राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. दरम्यान, यंदा राज्याला पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होवून जनजीवन विस्कळीत झाले.