Maharashtra Weather Update: पुढील चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्याता, विदर्भात यलो अलर्ट
कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पावसाळा सुरु होऊन दीड महिना झालं असला तरीही अद्याप समाधनाकारक पाऊस पडला नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, तिथं दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे. दरम्यान, राज्यातील मुंबईसह (Mumbai) उपनगर, ठाणे परिसरात पावसानं जोरदार (Heavy Rain) हजेरी लावली आहे. येत्या 4 दिवसात म्हणजे 16 ते 19 जुलै दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर CYCIR ची निर्मिती झाली आहे. तसेच NW दिशेने आत जाण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. (हेही वाचा - Manali Rain Video: हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर कायम, सखल भागात पूर आल्याने नागरिकांचे नुकसान)
आजपासून चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भाच्या काही भागातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज पुणे आणि परिसरात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे 19 ते 22 जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान मराठवाड्यातील शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसलेत. मराठवाड्यात तब्बल 44 टक्के पेरण्या बाकी आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्या देखील पावसाअभावी हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.