Maharashtra Weather Forecast: मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उद्या जोरदार पावसाची शक्यता
मात्र उद्यापासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या 48 तासांत ओडिशा राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील पर्जन्यस्थितीवरही होणार आहे. उद्या मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या दहा जिल्ह्यांसाठी उद्या (शनिवार, 16 ऑक्टोबर) येल्लो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रविवारी (17 ऑक्टोबर) कोकण, घाट परिसर आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता सर्वत्र जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर सोसाट्याचे वारे देखील वाहतील. 17 ऑक्टोबर, रविवारी नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, लातूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पंधरा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट दिला आहे. (Maharashtra Weather Update: विकेंडला राज्याच्या 'या' भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता)
दरम्यान, 11 ऑक्टोबर पासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आणि काल अखेर मान्सूनने कालच महाराष्ट्राचा निरोप घेतला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातून मान्सून कालच माघारी परतल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केलं. यावर्षी राज्यात मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला आणि वेळे आधीच माघारी परतला. त्यामुळे गेल्या 3-4 दिवसांपासून राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली. मात्र उद्यापासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे.