Maharashtra Weather : राज्यात येत्या 48 तासांत तापमान 2 ते 4 अंशांनी वाढण्याची शक्यता; सोलापुरात सर्वाधीक तापमानाची नोंद, पारा 39 अंशांवर

मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी भागामध्ये हवेत आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात अशीच परिस्थिती पहायला मिळेल.

Photo Credit - Twitter

Maharashtra Weather News : राज्यात येत्या 48 तासांत तापमान 2 ते 4 अंशांनी वाढण्याची शक्यता( Temperature) आहे. अवकाळीचं सावटही काही अंशी निवळल्याचं चित्र आहे. गुरुवारी सोलापुरात राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद (heatwave )करण्यात आली. तापमानाचा पारा 39 अंशांवर पोहोचला होता. विदर्भात पश्चिम भागामध्ये सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. हवामान विभागाने (IMD)वर्तवलेल्या अंदाजानुसार देशाच्या काही भागामध्ये 26 मार्चपर्यंत ढगांच्या गडगडाटासह वीजांच्या कडकडाटात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचं संकंट, हवामान विभागाने दिला ईशारा)

केरळपासून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याशिवाय, झारखंडपासून मेघालयपर्यंतसुद्धा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे या सर्व परिस्थितीचे थेट परिणाम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील ढगाळ वातावरणावर दिसून येत आहेत. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या अतीव उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसासह हिमवृष्टीचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. (हेही वाचा : Maharashtra Weather Update: उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात तापमानात होणार किंचित घट, हवामान विभागाचा अंदाज)

तामिळनाडू, पुदूच्चेरी आणि करईकल येथे पुढील दोन दिवस दमट वातावरण त्रास वाढवणार आहे. तर, महाराष्ट्राच्या शेजारी केरळ, माहे, सौराष्ट्र आणि कच्छ येथे पुढील चार दिवस दमट वातावरण नागरिकांना अनुभवण्यास मिळेल. देशाच्या पूर्वोत्तर भागात येणाऱ्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघलय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, उप हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीम येथे 21 ते 26 मार्चदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर आणि उत्तर पूर्वेला सुरु असणाऱ्या हवामानाच्या या स्थितीमुळं आता महाराष्ट्रातही सातत्यानं तापमानात बदल अपेक्षित आहेत.