Maharashtra Weather Forecast: पुणे, सातारा, सांगली सह कोकणात पुढील काही तास जोरदार पावसाची शक्यता, वीजांचा कडकडाट देखील होणार; वेधशाळेचा अंदाज
यावेळेस वीजांच्या कडकडाटासह,ढगांचा गडगडाटदेखील झाला आहे.
बंगालच्या पूर्व उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम आता महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दिसून आला आहे. हवामान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (10 ऑक्टोबर) पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसासह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी पासून मुंबई, ठाणे भागात बरसण्याची शक्यता आहे. तसेच पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद या भागात पुढील 3-4 तास मुसळधार पावसाचे असू शकतात.
मुंबई, ठाणे शहरामध्येही ढग दाटून आलेले आहेत. त्यामुळे पुढील काही तासांत ते बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यामध्ये मात्र दुपारच्या वेळी पावसाला सुरूवात झाली आहे. यावेळेस वीजांच्या कडकडाटासह,ढगांचा गडगडाटदेखील झाला आहे. Maharashtra Weather Forecast: 10 ऑक्टोबर पासून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होण्याची शक्यता.
महाराष्ट्र हवामान अंदाज 2020
दरम्यान सध्या मराठवाड्यामध्ये पुढील काही दिवस म्हणजे मंगळवार (13 ऑक्टोबर) पर्यंत परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीची कामं करण्यासाठी बाहेर पडताना शेतकर्यांनी काळजी घेणं आवशयक आहे. तुम्हांला वीजेच्या गडगडाटाबाबतचे अपडेट्स दामिनी अॅप वर मिळू शकतात. त्यामुळे बाहेर पडायचे झाल्यास त्याच्या मदतीने अंदाज घेऊन बाहेर पडा.