Maharashtra Weather Forecast: राज्याला आजही मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

याचबरोबर राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

बंगालच्या उपसागरातील गुलाब चक्रीवादळाची (Cyclone Gulab) तीव्रता कमी होऊन त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. त्यामुळे राज्यात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याचबरोबर राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर हा कालावधीत मुसळधार पावसाचा असणार आहे. या काळात कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर 40-45 ते 60 किमी प्रति वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभगी आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Raigad Weather Updates: रायगड मध्ये नदीकाठ, किनारपट्टी जवळ राहणार्‍यांनी सुरक्षित स्थळी रहावं, समुद्रापासून दूर राहण्याचा प्रशासनाचा इशारा)

कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाचास अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, गुलाब चक्रीवादळ सोमवारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकले. यामुळे कृष्णा आणि श्रीकाकुलम या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होवून जनजीवन विस्कळीत झाले.