Maharashtra Water Update: राज्यातील धरणांत केवळ 36 टक्के पाणीसाठा शिल्लक, पाण्याचे नियोजन करण्याची गरज
राज्यात पावसाळा सुरु होण्यासाठी अजून महिन्याभराचा काळावधी शिल्लक असताना राज्यातील धरणामधला पाण्याचा साठा कमी झाल्याने पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाळा सुरु होण्यासाठी अजून महिन्याभराचा काळावधी शिल्लक असताना राज्यातील धरणामधला पाण्याचा साठा कमी झाल्याने पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील धरणांमध्ये (Dam) जवळपास 36 टक्के पाणीसाठा (Water Storage) शिल्लक आहे. विशेष म्हणजे, पुणे विभागात (Pune Division) सर्वात कमी म्हणजे केवळ 28.83 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन देखील वाढत असल्याने, आत्तापासूनच पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात या भागातील शेतीसह उद्योग-व्यवसायांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात सध्या 139 मोठ्या, 259 मध्यम आणि 2605 लहान अशा एकूण 3003 धरणांमध्ये मिळून एकूण 22350.14 दशलक्ष घनमीटर (789 टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण 36.64 टक्के इतके आहे. गेल्यावर्षी याच तारखेला हा पाणीसाठा 37.39 टक्के होता. यावरून यंदा पाणीसाठा काहीसा कमी असल्याचे स्पष्ट होते. त्यातच यंदा पाऊस कमी असल्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे.
राज्यातील अनेक भागात आत्तापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे अनेक गाव आणि वस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे नियोजन करावे लागत आहे. तर सद्या राज्यातील 235 गावात आणि 606 वाड्यावर एकूण 184 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 43 शासकीय आणि 141 खाजगी टँकरचे समावेश आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2023 05:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

