IPL Auction 2025 Live

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मतदार यादीत घोळ', निवडणुक आयोगासह भाजपवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

आगामी विधानसभा निवडणूकांपूर्वी भाजपाकडून पराभवाच्या भीतीमुळे काही नावं मतदार यादी (Voters List) मधून वगळली जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मतदार यादी मध्ये घोटाळा होत असल्याचा मोठा आरोप करत भाजपा आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. आज त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकांपूर्वी भाजपाकडून पराभवाच्या भीतीमुळे काही नावं मतदार यादी (Voters List) मधून वगळली जात असल्याचं म्हटलं आहे. आणि या कारस्थानामध्ये भाजपाचा (BJP) हात असल्याचं म्हटलं आहे.

भाजपाने 100 पेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये हजारो मतदारांची नावं काढून टाकली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. सरकार विरोधी मतदारांची नावं काढून टाकून त्याच्याऐवजी बोगस मतदार यादी करण्याचं काम भाजपा करत असल्याचं ते म्हणाले आहेत. या षडयंत्राचे प्रमुख सूत्रधार अमित शाह असल्याचे ते म्हणाले आहेत. काही भाजपा नेते आणि बडे अधिकारीही यात सहभाग असल्याचा त्यांचा दावा आहे. Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाला सुधारित मशाल निवडणूक चिन्ह .

मविआ मध्ये बिघाडी ची चर्चा

सध्या मविआ चा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्वबळाची चाचपणी केली जाऊ शकते अशी चर्चा आहे. आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वर नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दोन दिवसांपूर्वी भर पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांवर नाना पटोलेंनी नाराजी बोलून दाखवल्यानंतर दोघांमधील वाद समोर आला होता. मीडीया रिपोर्ट्सनुसार नागपूर मध्ये काही जागांवरून कॉंग्रेस आणि उबाठा मध्ये वाद रंगला आहे. त्यामुळे ठाकरे गट आता स्वबळावर निवडणूकांना सामोरं जाण्याचा विचार करत आहे का? अशी चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणूका होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. 288 विधानसभा जागांवर निवडणूका होणार असून त्यामधील कोण नवं सरकार स्थापन करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. एनसीपी आणि शिवसेना या दोन्ही पक्षात उभी फूट पडल्यानंतरची पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.