Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वसूबारस चा मुहूर्त साधत आज अजित पवार, युग्रेंद्र पवार, अमित ठाकरे सह अनेक दिग्गज भरणार विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज अमित ठाकरे, एकनाथ शिंदे, युगेंद्र पवार आदी अनेकजण सज्ज झाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) उमेदवारी अर्ज भरण्याकरिता आज वसूबारस (Vasu Baras) निमित्त अनेक दिग्गज लगबग करताना दिसत आहेत. दादर माहिम मध्ये मनसे चे उमेदवार अमित ठाकरे (Amit Thackeray) , बारामती मध्येही एकमेकांसमोर ठाकलेले अजित पवार आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) देखील आजच अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे वांद्रे पूर्व चे उमेदवार वरूण सरदेसाई (Varun Sardesai) देखील आज वांद्रे मध्ये आपला अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान 20 नोव्हेंबर दिवशी होणार्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याकरिता 29 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. तर 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
अमित ठाकरे आज भरणार अर्ज
अमित ठाकरे यांच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या घरातून पहिलीच व्यक्ती निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. अमित ठाकरे यांनी आज अर्ज भरण्यापूर्वी शिवाजी पार्क भागामध्ये पूजनीय स्थळी जाऊन आशिर्वाद घेतले आहेत. यामध्ये गणेश मंदिरासह, शिवाजी पार्क भागात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर देखील नतमस्तक झाले. थोड्याच वेळात ते डिसिल्वा स्कूल मध्ये अर्ज दाखल करतील. Mahim Vidhan Sabha: माहिमचा हलवा कोणाचा? उद्धव ठाकरे यांचा उमेदवार मैदानात; सदा सरवणकर आणि मनसे प्रमुखांच्या चिरंजीवांसमोर आव्हान .
युगेंद्र पवार
युगेंद्र पवार यांनी बारामती मधून अजित पवारांना आव्हान दिले आहे. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूकीमध्ये आता 7 वेळेस आमदार म्हणून निवडून आलेल्या अजित पवारांना आव्हान दिले आहे. युगेंद्र हे मागील लोकसभा निवडणूकीपासून शरद पावारांसोबत प्रचारात फिरताना दिसले आहेत.
वरूण सरदेसाई
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व भागामध्ये यंदा ठाकरे गटाने वरूण सरदेसाईंना तिकीट दिले आहे. मागील निवडणूकीत 'मातोश्री'च्या अंगणातच शिवसेनेचा पराभव झाला होता. कॉंग्रेसचे झिशान सिद्दीकी येथून निवडून आले होते. आता हा मतदार संघ पुन्हा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे भाचे वरूण सरदेसाई यांना तिकीट दिले आहे. आज बीकेसी मध्ये वरूण सरदेसाई आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
आज महाराष्ट्रात दिवाळीच्या सणांमधील पहिला वसू बारस आहे. याचं औचित्य साधत अनेक दिग्गज मंडळी आपला अर्ज भरणार आहेत. त्यामध्ये अजित पवार, दादा भुसे,ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे.