Maharashtra Unseasonal Rain: राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान

राज्यातील 14 जिल्ह्यांमधील तब्बल 28 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली.

Crops affected by Unseasonal Rain (PC - Twitter)

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट अजूनही घोंघावत आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने अनेक भागांत अवकृपा केली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमधील तब्बल 28 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. नाशिक जिल्ह्यातील देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, कळवण, ईगतपुरी, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान केलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार आजही अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भासह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पुण्यातही मुसळधार पावसासह काही भागात गारपीट झाली. राज्यातील अवकाळी पावसाचा आढावा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवरील उपाययोजनांबाबत आज मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे.  सह्याद्री अतिथी गृह येथे ही बैठक पार पडणार आहे. एक वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलेला आहे.