Maharashtra Unlock 1 Phase 3: महाराष्ट्र अनलॉक 1 च्या तिस-या टप्प्याला आजपासून सुरुवात, पाहा राज्यात काय सुरु काय बंद
अनलॉक 1 मध्ये महाराष्ट्राने 3 टप्प्यात वर्गीकरण केले असून आज म्हणजेच 8 जूनपासून तिसरा टप्पा सुरु होणार आहे.राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत.
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा पाचवा (Lockdown 5.0) टप्पा सुरु आहे. मात्र यावेळी केंद्र सरकारने काही नियम शिथील करत 1 जूनपासून अनलॉक 1 (Unlock 1) ला सुरुवात केली आहे. मात्र महाराष्ट्रात चित्र थोडं वेगळं आहे. महाराष्ट्र राज्य हे रेड झोनमध्ये येत असल्यामुळे राज्यात अनलॉक 1 टप्प्याटप्प्याने नियम शिथिल करण्यात येत आहेत. अनलॉक 1 मध्ये महाराष्ट्राने 3 टप्प्यात वर्गीकरण केले असून आज म्हणजेच 8 जूनपासून तिसरा टप्पा सुरु होणार आहे.राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट अनलॉक 1 च्या तिस-या टप्प्यात म्हणजेच आजपासून खासगी कार्यालये गरजेनुसार किमान 10 टक्के कर्मचारी वर्गासह उघडू शकतात. इतरांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहित करावे असे राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीत म्हटले आहे. तसेच या कामाच्या ठिकाणी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व आवश्यक सोय केलेली असावी. Maharashtra Unlock 1 ला आजपासून सुरुवात, राज्यात काय सुरु काय बंद, येथे पाहा संपूर्ण यादी
राज्याबाहेर जाण्यासाठी किंवा आपल्या राज्यात येण्यासाठी परवानगीची गरज लागणार अथवा राज्यांतर्गत एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात अथवा दुस-या शहरात प्रवासासाठीही परवानगीची गरज लागणार आहे.
याआधी महाराष्ट्रात अनलॉकचे 2 टप्पे झाले. ज्यातील पहिला टप्पा 3 जून तर दुसरा टप्पा 5 जूनपासून सुरु झाला. यात 3 जूनपासून सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा देण्यात आली आहे. प्लंबर, इलेक्ट्रिशियन अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत असे सांगण्यात आले आहेत. सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारीवर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये कामे करण्यास मुभा देण्यात आली आहे.
तर 5 जूनपासून मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सम-विषम दिवस पद्धतीने सुरु करण्यात आली आहेत. टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकीमध्ये केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2, तर दुचाकीवर केवळ चालकाला परवानगी देण्यात आली आहे.