प्रतापगड जवळ अफजल खान वधाचा देखावा उभारून लाईट-साऊंड शो सुरू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस; पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

तेव्हा अफजल खानाच्या कबरी जवळील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे.

Pratapgarh ( Photo Credits : commons.wikimedia)

शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या (Pratapgarh) पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी जवळील अतिक्रमण हटवण्याचा सरकारने निर्णय घेतल्यानंतर आज पर्यटन मंत्र्यांकडून शिवप्रेमींना अजून एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, प्रतापगडावर आता शिवरायांचे भव्य स्मारक उभारण्यासोबतच गडावर एक साऊंड अ‍ॅन्ड लाईट शो देखील सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे असे लोढा यांनी ट्वीट करत सांगितले आहे.

सातारा मधील प्रतापगडाच्या परिसरात आता अफजल खानाच्या वधाचा देखावा देखील उभारून त्यावर हा साऊंड अ‍ॅन्ड लाईट शो प्रस्तावित आहे. दरम्यान आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खान याने छत्रपती शिवाजी महाराजांशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वेळीच सावधान झालेल्या शिवरायांनी जागीच अफजल खानाचा कोथळा काढून त्याला यमसदनी पाठवले.

मंगल प्रभात लोढा ट्वीट

लोढा यांनी पत्रात दिलेल्या माहितीनुसार, यंदा शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्या निमित्ताने आणि हिंदू एकता आंदोलन सातारा व इतर संघटनांनी केलेल्या मागणीनुसार, शिवप्रताप स्मारक उभारण्याचा, लाईट अ‍ॅन्ड साऊंड शो सुरू करण्याचा बाबत प्रस्ताव मागवण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. 10 नोव्हेंबर दिवशीच यंदाचा शिवप्रताप दिन झाला आहे.