महाराष्ट्रात अतिवृष्टी नुकसान झालेल्यांना मदतीची प्रतिक्षा; अजित पवारांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाच्या बैठक आणि महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता
केंद्र सरकार मदतीचा हात पुढे करेल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला आहे.
महाराष्ट्रात मागील 1-2 आठवड्यामध्ये राज्यभर झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये पीकांची नासधूस सोबत काहींची घरं, गुरं ढोरं वाहून गेल्याची माहिती आहे. त्याचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही गावांना भेट देऊन घेतला आहे. मात्र या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा फटका शेतकर्यांना बसल्यानंतर त्यांचं पुर्नवसन करण्यासाठी आर्थिक पॅकेज आणि मदतीची त्यांना अपेक्षा आहे. दरम्यान आज या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडाळाची बैठक होण्याची शक्यता आहे. यामध्ये आर्थिक पॅकेज वर चर्चा करून त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या प्रकृती अस्वस्थामुळे घरीच आहेत. मागील 2 दिवस त्यांनी काही बैठका रद्द केल्या आहेत. मात्र आता ते घरातूनच काम करायला लागले आहे. आजच्या बैठकीमध्ये अजित पवार देखील सहभागी होणार असल्याची माहिती मीडिया वृत्तांमधून समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह; खबरदारी म्हणून होम क्वारंटाईनचा निर्णय.
सरकारच्या मागील काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत महाराष्ट्र राज्यभरात जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा अधिकृत तपशील लवकरच दिला जाईल. मुख्यमंत्र्यांकडून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे पंचनामे झाल्यानंतर आता आर्थिक पॅकेज जाहीर केले जाऊ शकते. आधीच कोरोना संकट नंतर अवकाळी पाऊस याने राज्यातील शेतकरी बेहाल झाला आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेली स्थिती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. केंद्र सरकार मदतीचा हात पुढे करेल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला आहे.