Maharashtra State Budget 2022-23: 3 ते 25 मार्च दरम्यान होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन; 11 मार्च रोजी मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प

मात्र, 2021 मध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यांना प्रवास करायचा नसल्याने अधिवेशन मुंबईमध्ये झाले.

Maharashtra Legislative Assembly | (Photo Credit : Youtube)

राज्य विधिमंडळाचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) 3 मार्चपासून सुरू होणार असून, ते 25 मार्चपर्यंत होणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. राज्याचा 2022-23 चा अर्थसंकल्प (Maharashtra State Budget 2022-23) 11 मार्च रोजी मांडला जाणार आहे. यापूर्वी, अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात आयोजित करण्याबाबत चर्चा झाली होती, परंतु तेथील आमदार वसतिगृहाचा वापर कोविड केअर सेंटर म्हणून केला जात असल्याने सरकारने ते मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

परंपरेनुसार, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. मात्र, 2021 मध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यांना प्रवास करायचा नसल्याने अधिवेशन मुंबईमध्ये झाले. आता विरोधी पक्षांनी 2022 मध्ये नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. परंतु यंदाही अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार असल्याने 2021-22 या आर्थिक वर्षातील राज्य विधिमंडळाची तीनही मुंबईत आयोजित करण्यात आली आहेत.

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘या कामकाजात साधारण आता प्रलंबित असलेले एक बील आणि यापुढील काही दिवसांत जी बिले येतील, अशी अपेक्षित असलेली बिले ही मांडली जातील. अर्थसंकल्पावरील ज्या मागण्या असतील, त्यासाठी पाच दिवसांची चर्चा ही देखील मान्य करण्यात आलेली आहे,’ अशी माहिती अनिल परब यांनी दिली. (हेही वाचा: खुशखबर! राज्य सरकारतर्फे व्यवसायासाठी मिळत आहे 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या स्वरूप व कोण असेल पात्र)

दरम्यान, विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरमध्ये होते. परंतु महाविकास आघाडी सरकार गेले दोन वर्षे विविध कारणे सांगून दोन्ही अधिवेशने मुंबईत घेत आहेत. यावरून विरोधी पक्षाकडून नेहमी टीका केली जात आहे.