महाराष्ट्रात चार उपमुख्यमंत्री करावेत- बच्चू कडू
सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्री पद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये" असा सवाल देखील बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला.
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष कोण होणार ही चर्चा सुरु असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्रीपदासाठी देखील रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत अनेक हेवेदावे सुरु आहेत. यात "आता चार उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असं करावं" अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. वर्ध्याच्या स्थानिक विश्रामगृहात ते बोलत होते.
"उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे. सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्री पद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये" असा सवाल देखील बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला.
हेदेखील वाचा- 'अजित पवार पुन्हा नॉटरिचेबल होणार'; उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे जाणार या चर्चेवर निलेश राणे ट्विट
"अपक्षाला उपमुख्यमंत्री पद देत एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री करावं आणि एक वाढवत चार उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अस पाच होईल", अशी प्रतिक्रिया मंत्री कडू यांनी व्यक्त केली.
दरम्यान उपमुख्यमंत्री पदासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या तिघांची नावे चर्चेत आहेत. यात बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु, उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे जाणार या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांनी मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. त्यांच्या निर्णयानुसार आम्ही कामं पुढे नेत आहोत. मात्र काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल होत असतील तर त्यात कुणी पडण्याचे कारण नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.