धक्कादायक! देशात गुन्ह्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल, महाराष्ट्राचा दुसरा नंबर; स्त्रियांसाठीही असुरक्षित राज्य

उत्तर प्रदेशमध्ये एका वर्षात तीन लाखांहून अधिक एफआयआर नोंदविले गेले आहेत्र. उत्तर प्रदेशनंतर नंबर लागतो तो महाराष्ट्राचा

Image used for representational purpose

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (National Crime Records Bureau) सोमवारी (21 ऑक्टोबर 2019), सुमारे दोन वर्षांच्या विलंबानंतर भारतातील वार्षिक गुन्हे (Crime in India) 2017 चा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात गुन्ह्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका वर्षात तीन लाखांहून अधिक एफआयआर नोंदविले गेले आहेत्र. उत्तर प्रदेशनंतर नंबर लागतो तो महाराष्ट्राचा. त्यानंतर अनुक्रमे मध्य प्रदेश, केरळ आणि दिल्ली तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. त्यानंतर सहाव्या स्थानावर बिहार आहे.

2017 मध्ये देशात एकूण 30,62,579 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2015 मध्ये त्यांची संख्या 29,49,400 आणि 2016 मध्ये 29,75,711 होती. उत्तर प्रदेशात सलग तिसर्‍या वर्षी गुन्ह्यांचा बाबतील अव्वल ठरले आहे. 2015 मध्ये राज्यात 2,41,920 आणि 2016 मध्ये 2,82,171 गुन्हे नोंदवले आहेत. देशाच्या एकूण गुन्ह्यांपैकी 10 टक्के गुन्हे एकट्या उत्तर प्रदेश येथे घडले आहेत. महाराष्ट्रामध्ये देशातील एकूण गुन्ह्यापैकी 9.4 टक्के गुन्हे घडले आहेत. महाराष्ट्रामध्ये 2017 साली 2,88,879 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2015 मध्ये 2,75,414 आणि 2016 मध्ये 2,61,714 गुन्ह्यांची नोंद झाली होती. (हेही वाचा: चेहऱ्यावरील भाव पाहून गुन्हेगाराचा खरेपणा ओळखणारी सिस्टम; मुंबई पोलीस चाचणी घेण्याची शक्यता)

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारने अनेक कायदे केले. मात्र आता महाराष्ट्रही महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे दिसत आहेत. महिलांवरील अत्याचाराबाबतही उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे 31,979 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. लहान बालकांवरील अत्याचार, वेश्याव्यवसाय, महिलांची तस्करी, महिलांचे अपहरण, आत्महत्या करण्यास उत्तेजना देणे, बलात्कार व त्यानंतर हत्या अशा काही गुन्ह्याच्या बाबतील महाराष्ट्राचा नंबर पहिल्या पाच राज्यांमध्ये लागतो.