Maharashtra Rain Update: 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान राज्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता; प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस

Image For Representation (Photo Credits: PTI)

साधारण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मॉन्सून (Monsoon) संपला असला तरी, अजूनही देशातील काही भागांमध्ये परतीचा पाऊस सुरु आहे. आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस (Heavy rainfall) होणार आहे, बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे राज्यात कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आधी सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम, मुसळधार पाऊस सुरुही झाला आहे. काही ढिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत.

याबाबत सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांना प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये सरकारने म्हटले आहे. ‘भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ईशाऱ्यानुसार दि. 13.10.2020 ते  17.10.2020 या कालावधीत राज्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. विशेषत: किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये वीजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. सदर कालावधीमध्ये आपल्या पातळीवरून सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा ईशारा देण्याबाबतच्या सुचना तात्काळ देण्यात  याव्यात, जेणे करून मनुष्य हानी टाळता येणे शक्य होईल.’ (हेही वाचा: Train Update: मुंबईत मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर या आठवड्यापासून चालवल्या जाणार स्पेशल ट्रेन)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचे रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. गुरुवारी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगडसाठी बुधवारी आणि गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बुधवारसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्याचा अर्थ राज्यातील विविध भागात पाऊस पडू शकतो. या पाऊस विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस असेल. शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे.