Maharashtra Rain Update: येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघरसह उत्तर कोकणात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता- IMD

सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला आहे. आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

Maharashtra Monsoon Update: तेलंगानामध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता व आता तो पुढे महाराष्ट्राकडे सरकला आहे. आयएमडी वेदर ब्युरोने 15 ऑक्टोबरसाठी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड, अहमदनगर, रत्नागिरी, सातारा यासारख्या जिल्ह्यांत ऑरेंज अ‍ॅलर्ट (मुसळधार ते अति मुसळधार पाऊस) जारी केला आहे. तसेच पुढील तीन दिवस दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये मुंबई (Mumbai),  ठाणे (Thane), पालघरसह (Palghar) उत्तर कोकणात येत्या 24 वाजता वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला आहे. आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

प्रशासनाने सर्वांनी सुरक्षित ठिकाणी थांबा, घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला आहे. अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, कोल्हापूर, मुंबई आणि उपनगरे, नागपूर, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, वाशिम येथे पुढील 6 ते 8 तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ईशाऱ्यानुसार दि. 13.10.2020 ते 17.10.2020 या कालावधीत राज्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचायला सुरुवात तर काही ठिकाणची वीज गायब

विशेषत: किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये वीजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दरम्यान, मच्छीमारांना आणि समुद्राच्या क्षेत्रातील लोकांसाठी खास अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छीमारांना महाराष्ट्र व दक्षिण गुजरातच्या सीमेसह आणि पूर्वेच्या मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर, 15 ऑक्टोबरपासून त्यानंतर 3 दिवस समुद्रामध्ये जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे राज्यात कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आधी सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे.