Maha Jobs Yojana महाविकासआघाडी सरकारची की शिवसेना-राष्ट्रवादीची? महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांना पडलाय प्रश्न
महाविकासआघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत असे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी कितीही सांगितले तरी प्रत्यक्षात मात्र अनेकदा तसे नसल्याचेच पुढे येत आहे.
Maha Jobs Yojana ही नेमकी महाविकासआघाडी सरकारची आहे की केवळ शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाची? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (Maharashtra Pradesh Youth Congress) अध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पडला आहे. तांबे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याबाबत सवाल विचारला आहे. तसेच, किमान समान कार्यक्रमात ( Common Minimum Program) ठरलेल्या शिष्टाचारांची अंमलबजावणी व्हावी अशी भावनाही व्यक्त केली आहे.
सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्य सरकारच्या योजनेबाबत माहिती देणारे एक पोस्टर पोस्ट केले आहे. ज्यात महा जॉब्स पोर्टल (Maha Jobs Portal ) आणि महा जॉब योजना आदींबाबत माहित देण्यात आली आहे. या पोस्टरमध्येच तांबे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे कारण दिसते आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचीच छबी दिसत आहे. ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक आणि अदिती तटकरे यांचे फोटो दिसतात. या पोस्टरमध्ये काँग्रेस पक्षाच्या कोणत्याच नेत्याला स्थान मिळालेले दिसत नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी आपली नाराजी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. (हेही वाचा, How To Register At Mahajobs Portal: राज्यातील स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारने सुरु केले ‘महाजॉब्स’ पोर्टल; जाणून घ्या कशी करावी नोंदणी)
सत्यजित तांबे यांनी ट्विटमध्ये काय म्हटले आहे?
सत्यजित तांबे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, '''महा जाॅब्स्' ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे''.
महाविकासआघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत असे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी कितीही सांगितले तरी प्रत्यक्षात मात्र अनेकदा तसे नसल्याचेच पुढे येत आहे. त्यामळे सरकारमधील घटक पक्षाचे नेते कधी अप्रत्यक्ष तर कधी प्रत्यक्षपणे आपली नाराजी उपस्थित करताना दिसत आहेत. सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेला प्रश्नही असाच आहे.