Nitin Deshmukh: एकनाथ शिंदे यांना धक्का; ती सही माझी नव्हेच; शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट

आपणास कोणीही सही मागितली नाही. ही सही कोणाची आहे माहिती नाही, असा गौप्यस्फोटच नितीन देशमुख यांनी केला आहे.

Nitin Deshmukh, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेना (Shiv Sena) आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी जोरदार धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाला दिलेल्या त्या पत्रावर असलेली सही आपली नव्हेच. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असताना आपण कोणत्याही कागदावर सही केली नाही. आपणास कोणीही सही मागितली नाही. ही सही कोणाची आहे माहिती नाही, असा गौप्यस्फोटच नितीन देशमुख यांनी केला आहे. मुळात ती सही मराठीत आहे. मी मराठीत सहीच करत नाही. माझी सही ही नेहमी इंग्रजीत असते, असेही नितीन देशमुख यांनी म्हटले आहे.

नितीन देशमुख हे बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरत येथे असलेल्या बंडखोर आमदारांमध्ये नितीन देशमुख यांचाही समावेश होता. मात्र, नितीन देशमुख हे तिथून परत महाराष्ट्रत आले आहेत. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांचेच निष्ठावान शिवसैनिक असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Shiv Sena MLA Nitin Deshmukh: गुजरात पोलिसांकडून जबरदस्ती, शरीरात इंजेक्शन्स घुसवली; एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक आरोप)

गुजरात पोलिसांनी आपल्याला जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले. तिथे आपल्यावर उपचारांच्या नावाखाली आपल्या शरिरात इंजेक्शन्स खुपसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. आपल्यासोबत असे वर्तन करताना त्यांचा काय हेतू होता हे आपल्याला कळले नसल्याचेही देशमुख यांनी म्हटले होते. नितीन देशमुख यांनी पुढे बोलताना म्हटले की, आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे कारण देत रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. मला कोणत्याही प्रकारे हृदयविकाराचा झटका नव्हता. मात्र, गुजरात पोलीस आणि वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा हेतू आपल्याला सांगला वाटला नाही. 20-25 लोकांनी मला पकडून ठेवले आणि त्यांनी जबरदस्तीने माझ्या शरीरामध्ये इंजेक्शन टोचले. ते कोणते होते हे मला माहिती नव्हते. मात्र, माझ्यावर काहीतरी चुकीची प्रक्रिया करण्याचे त्यांचे षडयंत्र मला स्पष्ट दिसत होते, असेही नितीन देशमुख यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नितीन देशमुख यांच्या दाव्यामुळे एकनाथ शिंदे यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. नितीन देशमुख यांच्या दाव्याचा अर्थ असाही काढला जातो आहे की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या एकूण आमदारांपैकी खरोखरच मनापासून त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या किती आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये उल्लेख केला की, महाराष्ट्राबाहेर असलेल्या अनेक आमदारांचे आपल्याला फोन येत आहेत. त्यांना परत महाराष्ट्रात आपल्यासोबत परत यायचे आहे.