Maharashtra Political Crisis: शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे गटाच्या अस्तित्त्वाच्या लढाईची आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी; पहिल्यांदा लाईव्ह प्रक्षेपणही
न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे हे घटनापीठ असून त्यामध्ये न्यायाधीश एम.आर. शाह, न्यायाधीश हिमा कोहली, न्यायाधीश नरसिंहा, न्यायाधीश कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खरी शिवसेना कुणाची ही अस्तित्त्वाची लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी कायदेशीर लढाई मागील काही महिनांपासून सुरू आहे. आता घटनापीठासमोर या दोन्ही गटाचे दावे- प्रतिवादे ऐकल्यानंतर प्रकरण महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहचले आहे. आता कुणाच्या बाजूने या प्रकरणाचा निकाल लागणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. यामध्येच आता आजपासून घटनापीठाच्या केसेसचं लाईव्ह प्रक्षेपण यू ट्यूबवर होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तांतराचे प्रकरण हेच लाईव्ह प्रक्षेपण होणारे पहिले प्रकरण आहे.
महाराष्ट्रातील सत्तांतर, महाराष्ट्रातील 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा, राज्यपाल आणि विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी कायदा अशा महत्वाच्या मुद्द्यांवर आता न्यायालय काय निर्णय याकडे देखील सार्यांचे लक्ष लागले आहे. इथे पहा सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी लाईव्ह.
पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे महाराष्ट्रातील सत्तानाट्याच्या प्रकरणी सुनावणी होणार आहे. न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे हे घटनापीठ असून त्यामध्ये न्यायाधीश एम.आर. शाह, न्यायाधीश हिमा कोहली, न्यायाधीश नरसिंहा, न्यायाधीश कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडी सरकार मधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेच्या 40 आमदारांनी भाजपा सोबत जाऊन नवं सरकार स्थापन केले. आता या सरकारच्या अस्तित्त्वावर प्रश्न उठवण्यात आले आहेत. यानंतर शिवसेनेचं पक्ष चिन्हं गोठवणार का? याकडेही लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर आता निवडणूक आयोगासमोर याबाबतही सुनावणी आणि निकाल अपेक्षित आहे.