Lockdown काळात 1 लाखाहून अधिक गुन्हे दाखल; नियम मोडणाऱ्यांकडून 3 कोटींहून अधिक दंडवसुली- अनिल देशमुख
लॉकडाउन काळात महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत तब्बल 1 लाख 3 हजार आणि 345 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या नियम मोडणाऱ्यांकडून आतापर्यंत एकूण तब्बल 3 कोटी 87 लाख 50 हजार 494 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे,
कोरोना व्हायरस (Coronavirus) चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जवळपास दोन महिन्यांपासून देशभरात लॉक डाऊन (Lockdown) लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सुद्धा 25 मार्च पासून सुरु झालेले लॉक डाऊन अद्याप कायम आहे. महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसल्याने लॉक डाउनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जावे असे सर्व जनतेला वारंवार सांगितले जातेय. मात्र तरीही अनेकजण नियमांना धाब्यावर बसवत सर्रास बाहेर फिरताना दिसून येतात, अशा लोकांवर महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत तब्बल 1 लाख 3 हजार आणि 345 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या नियम मोडणाऱ्यांकडून आतापर्यंत एकूण तब्बल 3 कोटी 87 लाख 50 हजार 494 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, याबाबात महाराष्ट्र राज्य गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. Coronavirus: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सहित तुमच्या जिल्ह्यात किती COVID19 रुग्ण आहेत, पहा
अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आयपीसी कलम 188 अंतर्गत 1,03,345 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, यामध्ये 19,630 जणांना अटक करण्यात आली आहे तर 55,784 वाहने जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय 1,291 गुन्हे हे अवैध वाहतुकीसाठी दाखल करण्यात आले आहेत तर राज्यातील पोलिसांवर हल्ले केल्याच्या 207 घटनांमध्ये 747 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यात क्वारंटाईन करण्यात आलेल्या 662 जणांवर सुद्धा नियम मोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल केलेले आहेत.
अनिल देशमुख ट्विट
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा 22,171 वर पोहचला आहे तर आजवर कोरोनाने 832 बळी घेतले आहेत. यात 4199 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे देशातील परिस्थिती सुद्धा दिवसागणिक गंभीर होत आहे. आज घडीला देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 67,152 वर पोहोचली आहे. यात सध्या 44,029 रुग्णांवर उपचार सुरु असून 20,917 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.