Raj Thackeray यांची आज पुण्यात Ganesh Kala Krida Manch मध्ये सभा; अयोद्धा दौर्‍याच्या पुढील दिशेबाबत घोषणेकडे लक्ष

या सभेला 10 ते 15 हजार लोकं येण्याची शक्यता आहे.

MNS | Twitter/ANI

पुण्यात आज (22 मे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होणार आहे. पावसाच्या शक्यतेमुळे खुल्या मैदानात सभा घेण्याऐवजी बंद वातावरणात सभा घेण्याचा निर्णय झाला आहे. सभेसाठी गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) निवडण्यात आला आहे. पुण्याचे मनसे प्रदेशाध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सभेला 10 ते 15 हजार लोकं येण्याची शक्यता आहे. हे देखील नक्की वाचा: Raj Thackeray's Pune Rally: राज ठाकरे यांच्या पुणे सभेसाठी पोलिसांनी घातल्या 13 अटी; उल्लंघन झाल्यास होणार कारवाई.

दरम्यान काही दिवसांपूर्वी 4 दिवसांच्या पुणे दौर्‍यावर असलेले राज ठाकरे 2 दिवसांतच मुंबईला परतले. काही वर्षांपूर्वी टेनिस खेळताना दुखावलेला पाय पुन्हा त्रास देत असल्याने ते परत आल्याचं सांगितलं जातं. या दुखण्यामुळे त्यांनी आगामी 5 जूनचा अयोद्धा दौरा देखील रद्द केला आहे. राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी त्याला कडाडून विरोध केला. राज ठाकरेंनी  युपी किंवा किमान युपीतील संतमहंतांची माफी मागावी मगच उत्तर प्रदेशच्या भूमीत पाय ठेवायला देऊ असं आव्हान दिलं होतं. त्यामुळेही राजा ठाकरेंचा दौरा चर्चेत होता. नक्की वाचा: Raj Thackeray Ayodhya Tour: राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन .

ट्वीट करत अयोद्धा दौरा तूर्तास स्थगित असं त्यांनी जाहीर केल्यानंतर आता हा दौरा कधी, कसा होणार? याबद्दल राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं मनसैनिकांसाठी आतुरतेचे आहे. सोबतच भोंगा आंदोलनावरून भुमिगत असलेले संतोष धुरी, संदीप देशपांडे अन्य दोघांना झालेली 16 दिवसांची जेलवारी यावरूनही राज्य सरकारवर हल्लाबोल केला जाऊ शकतो.