Maharashtra Monsoon: सांगली मध्ये पावसाची तुफान बॅटिंग, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, दोन गावांंचा संपर्क तुटला

गेल्या 3 दिवसांपासून सांगली मध्ये कृष्णा नदीच्या (Krishna River) पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस होत होता आणि आता त्यात कोयना धरणातुन (koyna Dam) सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

Sangali Krishna River (Photo Credits: Twitter)

Maharashtra Monsoon: महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासुन पावसाचे थैमान सुरु आहे, कोल्हापुर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली (Sangali) या भागात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. गेल्या 3 दिवसांपासून सांगली मध्ये कृष्णा नदीच्या (Krishna River) पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस होत होता आणि आता त्यात कोयना धरणातुन (koyna Dam)  सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तर दुसरीकडे अनेक पुल सुद्धा पाण्याखाली गेले आहेत. सांगली जवळील कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज गावचा पर्यायी पूल पाण्याखाली गेला असुन त्यामुळे दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. पाण्याचा वेढा वाढल्याने या गावातील लोक स्थलांतर होऊ लागले आहेत. महाराष्ट्र: कोल्हापूर मध्ये पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलंडण्याच्या मार्गावर आहे. आयर्विन पुलावर 38 फूट पाणी पातळी पोहचली आहे. सध्या पावसाचा कमी झालेला जोर पाहता सांगलीत आयर्विन पूलाजवळ जास्तीत जास्त पाणी पातळी 41 फूट होऊन स्थिर होण्याची संभावना आहे. कृष्णेची इशारा पातळी 40 तर धोका पातळी 45 फूट आहे.  (Maharashtra Monsoon Update: पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर 18,19 ऑगस्टसाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी)

दरम्यान, आतापर्यंत कृष्णा नदीच्या भागातील सुमारे 100 हुन अधिक घरांमध्ये पाणी घुसले आहे. सुमारे 200 हुन अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.पुरजन्य परिस्थिती लक्षात घेता संभाव्य धोका लक्षात घेउन खबरदारीच्या उपाययोजना करायला सुरुवात केली आहे.