Maharashtra Monsoon 2020 IMD Prediction: मुंबई मध्ये 11 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता तर कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर 2-3 जूनपर्यंत मान्सूनपूर्व सरी बरसतील; हवामान खात्याचा अंदाज

तर महाराष्ट्रात कोकणासह पश्चिम किनारपट्टीच्या भागात 2-3 जून पर्यंत मान्सून पूर्व सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

मुंबईसह महाराष्ट्रभरात सध्या उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने आता सामान्यांना पावसाचे वेध लागले आहेत. यंदा महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकर्‍यांसह सामान्य नगरिकही आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology)  के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी लेटेस्टली मराठीशी बोलताना दिलेल्या माहितीमध्ये यंदा मुंबईमध्ये मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख 11 जून आहे. म्हणजे 11 जूनच्या आसापास मुंबईमध्ये पावसाची बरसात होऊ शकते. तर महाराष्ट्रात कोकणासह पश्चिम किनारपट्टीच्या भागात 2-3 जून पर्यंत मान्सून पूर्व सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भासह उत्तर भारतामध्ये वाढलेला उन्हाचा पारा पुढील 2-3 दिवसामध्ये ओसरणार आहे अशी दिलासादायक माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 3 दिवसांपूर्वी प्रादेशिक हवामान विभागाचे मुख्य अधिकारी राजेंद्र कुमार जेनमणी यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, केरळ मध्ये 1 ते 5 जून च्या दरम्यान नैऋत्य मोसमी मान्सुन दाखल होईल आणि त्यांनंतर दहा दिवसांनी मुंबईत मान्सूनचा पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

अंदमान निकोबार पाठोपाठ केरळ आणि नंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणारा पाऊस कोकणासह उर्वरित महाराष्ट्रात हळूहळू सक्रिय होणार आहे. त्यामुळे आता शेतीची कामं, पेरणीची काम देखील वेग धरणार आहे. यंदाच्या पावसाचा अंदाज वर्तवताना यापूर्वीच हवामान खात्याने यंदा मुबलक पाऊस पडणार असल्याची दिलासादायक बातमी शेतकर्‍यांना दिली आहे. त्यामुळे आता सारेच यंदा पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान राज्यातील कोरोनाचं संकट पाहता यंदा पावसात विनाकारण भिजणं टाळा असं आवाहन काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पण लॉकडाऊनमुळे घरात अडकलेले देशवासिय खिडकीत बसून का होईना यंदा पावसाचा आनंद लुटण्यासाठी सज्ज आहेत.