Maharashtra MLC Election 2020: उर्मिला मातोंडकर यांचे नाव शिवसेना कोट्यातून राज्यपाल नियुक्त जागेसाठी सूचवण्यामागे 'हे' आहे कारण

त्यांचं आणि आमचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. जे जगाला माहिती आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावावरुन निर्णय घेताना वाद निर्माण होणार नाही याची ते काळजी घेतील असा टोलाही राऊत यांनी या वेळी लगावला.

Urmila Matondkar | (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar ) यांना राज्यपाल नियुक्त आमदार (Governor Quota) म्हणून विधानपरिषदेवर (Maharashtra MLC) पाठविण्यासाठी महाविकासआघाडी सरकारने शिफारस केलेली पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. शिवसेना (Shiv Sena) आपल्या कोट्यातून मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशीमागे नेमके कारण काय? असा प्रश्न सहाजिकच विचारला जातो आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यामागचे कारण सांगितले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाच्या शिफारशीबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, देश आणि राज्य यांची सामाजिक बांधिलकी जपणारी, विविध विषयांचे आकलन असलेली, सडेतोड बोलणार व्यक्ती महाराष्टाच्या विधानपरिषदेत आली तर त्याचा राज्याला फायदा होईल. त्यामुळेच राज्य सरकारने मातोंडकर यांच्या नावाची शिफारस राज्यपाल नियुक्त जागांसाठी केली आहे. असे राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्याचे विद्यमान राज्यपाल अत्यंत सुज्ञ आहेत. त्यांचं आणि आमचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. जे जगाला माहिती आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावावरुन निर्णय घेताना वाद निर्माण होणार नाही याची ते काळजी घेतील असा टोलाही राऊत यांनी या वेळी लगावला. (हेही वाचा, Maharashtra MLC Elections 2020: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिची शिवसेनेकडून MLC साठी नावाची शिफारस, राज्यपालांना पाठवली 12 लोकांची यादी)

एक बहुआयामी व्यक्तीमत्व अशी मातोंडकर यांची ओळख आहे. मातोंडकर या प्रामुख्याने बॉलिवूड अभिनेत्री राहिल्या आहेत. आजही त्यांची ओळक अभिनेत्री अशीच आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस तिकीटावर निवडणूक लढवली होती. गोपाळ शेट्टी या भाजप उमेदवाराच्या त्या प्रमुख प्रतिस्पर्धी होत्या. मात्र, या निवडणुकीत त्यांना यश मिळू शकले नाही. त्यानंतर काही काळांनी त्यानी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. आता त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. (हेही वाचा, उर्मिला मातोंडकर राजकारणात कशा आल्या? त्यांनी काँग्रेस पक्षच का स्वीकारला?)

महाविकास आघाडीकडून पाठविण्यात आलेली 12 नावे

शिवसेना –  नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर

राष्ट्रवादी – राजू शेट्टी, एकनाथ खडसे,  यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे

काँग्रेस – सचिन सावंत, रजनी पाटील ,मुझ्झफर हुसेन,  गायक अनिरुद्ध वनकर

राज्यपाल नियुक्त जागेसाठी काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतू त्या राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचे, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन करुन उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेवरील आमदारकीबाबत विचारणा केली होती. त्यानंतर मातोंडकर यांनी शिवसेनेचा प्रस्ताव स्वीकारत विधानपरिषदेवर जाण्याची तयारी दर्शवली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.