Maharashtra MLC Election 2020: देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची रणनीती अयशस्वी; विधान परिषद निवडणुकीत भाजप सपाटून पराभूत, काय आहेत कारणं?

विधानपरिषद निवडणुकीने भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर महाविकासआघाडी अधिक बळकट झाली आहे. त्यामुळे या जय-पराजयाचे नक्कीच विश्लेषण केले जाईल. भाजपच्या नामुष्कीजनक पराभवाची सांगितली जाणारी काही कारणे.

Devendra Fadnavis, Chandrakant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विधान परिषद निवडणूक 2020 (Maharashtra MLC Election 2020) मध्ये भाजपने सपाटून मार खाल्ला. अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे (Pune), नागपूर (Nagpur) येथेही भाजप नामुष्कीजनकरित्या पराभूत झाले. विधानपरिषद निवडणुकीने भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर महाविकासआघाडी अधिक बळकट झाली आहे. धुळे येथील एका जागेचा अपवाद वगळता सर्व ठिकाणी महाविकासआघाडीचे उमेदवार वियजी झाले. भाजप पराभूत झाला. त्यामुळे या जय-पराजयाचे नक्कीच विश्लेषण केले जाईल. भाजपच्या नामुष्कीजनक पराभवाची सांगितली जाणारी काही कारणे.

पुणे- नवी चाल अंगाशी आली

पुणे पदवीधर मतदारसंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. अपवाद वगळता या मतदारसंघातून विधान परिषदेवर भाजपचाच उमेदवार निवडूण गेला आहे. या मतदारसंघात भाजपची नोंदणी चांगली आहे. त्यामुळे येथून भाजपचा उमेदवार वारंवरा निवडूण येत आहे. त्यातच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, तसेच चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केल्याने हा मतदारसंघ भाजपचा गड समजला जातो. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020 Results: भाजपला पुन्हा सुतक, चंद्रकांत पाटील यांची खुमखुमी चांगलीच जिरली- शिवसेना)

दरम्यान, या वेळच्या निवडणुकीत पुणे शहराबाहेरील उमेदवार देत (संग्राम जगताप) विरोधकांच्या मतांची विभागणी होईल असे आडाखे बांधले. परंतू, प्रत्यक्षात ती खेळी भाजपच्या अंगाशी आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड प्रथम क्रमांकाच्या पसंतीची मते घेऊन विजयी झाले. पुण्याबाहेरील उमेदवार देणे हे भाजपसाठी अधिक धोक्याचे ठरले. त्यामुळे भाजपचा पराभव झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. उगाचच निवडणूक प्रतिष्ठेला नेऊन भाजपने उगाचच उत्सुकता वाढवली. ज्यामुळे विरोधकांनी आपली रणनिती अधिक मजबूतपणे आखली. परिणामी भाजपचा पराभव झाल्याची चर्चा आहे. पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीतही हेच चित्र दिसले. भाजप उमेदवाराचा पराभव करुन काँग्रेस पक्षाचे जयंत आसगावकर विजयी झाले.

नागपूर- शेवटपर्यंत एकी झालीच नाही

निवडणूक कोणतीही असो. भाजपची बांधणी आणि रणनिती चोख. गेल्या काही काळात हे चित्र स्पष्टपणे पुढे येताना दिसले. परंतू, या वेळी नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला थेट पराभव स्वीकारावा लागला. 58 वर्षांत प्रथमच असे घडले. त्यामुळे पुणे येथे जसा चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे तसाच धक्का नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना बसला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नागपूरमध्ये भाजपची पिछेहाट तर काँग्रेसची सरशी होताना दिसत आहे.

नागपूर भाजपातून पदविधर निवडणुकीसाठी माजी आमदार अनिल सोले आणि महापौर संदीप जोशी आघाडीवर होते. पैकी, देवेंद्र फडणवीस यांनी संदीप जोशी यांच्या पारड्यात आपले वजन टाकले आणि इथेच उमेदवार निवडीत चूक झाली. जोशी यांनी उमेदवारी तर मिळवली. पण, निवडणूक मात्र जिंकली नाही. काँग्रेस पक्षाच्या ॲड. अभिजित वंजारी यांनी जोशी यांचा पराभव केला. गेली 58 वर्षे हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे राखला. परंतू, विधानसभा निवडणुकीत शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसने बाजी मारली आणि भाजपची पकड सुटू लागली. त्यातच भाजपला शेवटपर्यंत या मतदारसंघात नेते आणि कार्यकर्ते यांच्यात एकी करता आली नाही. परिणामी नागपूरमध्ये भाजपचा दणदणीत पराभव झाला. नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना विरोध केल्यामुळे संदीप जोशी यांच्या विरोधात नागपूरकरांमध्ये नाराजी होती.

औरंगाबाद: दिग्गजांची फौज उतरुनही भाजप पराभूत

मराठवाडा पदवीधर निवडणूक मतदारसंघातून भाजपचे शिरीष बोराळकर रिंगणात होते. बोराळकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बोराळकरांना विजयी करण्याचे अवाहन केले होते. तर विधानपसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आशिष शेलार, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक दिग्गजांनी बोराळकरांच्या प्रचारात हजेरी लावली. परंतू, तरीही बोराळकर यांच्या विजयाची पाटी कोरीच राहिली. महाविकासआघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी 57,895 मते मिळवत बोराळकरांचा दणदणीत पराभव केला.

पक्षात प्रचंड जनसंपर्क आणि पदविधरांसाठी काम केलेले नेते असूनही त्यांना डावलण्यात आले. ज्येष्ठ आणि अनुभविंना डावलून शिरीश बोराळकर यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. त्यातच बोराळकर यांनी पदवीधर मतदारांसाठी विशेष काहीही केले नसल्याचा सूर उमटत होता. त्यामुळे दिग्गजांची फौज येऊनही भाजपच्या बोराळकरांचा पराभव झाला,

धुळे- काँग्रेस पक्षातून आयात उमेदावाराचा भाजपमध्ये विजय

नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत अमरीश पटेल यांच्या रुपात भाजपने काहीशी आब्रू वाचवली. परंतू, हा विजय भाजपचा म्हणता येणार नाही. मुळात विजयी झालेले अमरिश पटेल हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नते. अलिकडेच त्यांनी भाजप प्रवेश केला. त्यातच भाजपने त्यांना तिकीट दिले. पटेल निवडून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा भाजपचा नव्हे तर अमरिश पटेल (अप्रत्यक्षरित्या काँग्रेस) यांचा विजय असल्याचे मानले जात आहे.

विधानपरिषद निवडणूक 2020 विजयी उमेदवार

दरम्यान, विधानपरीषद निवडणुकीतील यशापयशावरुन महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. महाविकासआघाडीने एकीचे बळ दाखवून दिले आहे. तर, दुसऱ्या बाजूला अनेक पक्षांषी युती करुन विधानसभा निवडणूक लढणाऱ्या भाजपने आमच्यासमोर एकेकट्याने लढून दाखवा, असे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला आव्हान देत राजकीय विनोद केला आहे.