Vijay Wadettiwar tested positive for Covid-19: विजय वडेट्टीवार यांना कोविड-19 ची लागण

वडेट्टीवार यांनी स्वत: या संदर्भातील माहिती ट्विट करत दिली आहे.

Vijay Wadettiwar (Photo Credits: FB)

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना कोविड-19 (Covid-19) ची लागण झाली आहे. वडेट्टीवार यांनी स्वत: या संदर्भातील माहिती ट्विट करत दिली आहे. सध्या ते विलगीकरणात असून डॉक्टरांच्या सल्लानुसार औषधोपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसंच संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. दरम्यान, यामुळे विधीमंडळात एकच खळबळ उडाली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "अर्थसंकल्पीय अधिवेशन निमित्त मुंबई येथे असून आज कोरोना चे लक्षण दिसल्याने मी माझी कोव्हीड टेस्ट केली,टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार मी घेत आहे.लवकरच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. मागील 2 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी, नागरिकांनी सुद्धा आपली काळजी घ्यावी ही विनंती."

Vijay Wadettiwar Tweet:

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 1 मार्च पासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस होता. अधिवेशासाठी सरकारने योग्य ती खबरदारी घेऊनही अधिवेशनात सहभागी झालेल्या विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. अधिवेशनापूर्वी देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान, अधिवेशनापूर्वी आमदार, मंत्री, अधिकारी, पत्रकार, आमदार-मंत्र्यांसह सर्वांनाच कोरोना चाचमई करणं बंधनकारक होतं. या नियमांनुसार सुमारे 3200 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 25 जणांना कोरोना झाल्याचे निर्दशनास आले होते.