Vijay Wadettiwar On Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? विजय वडेट्टीवार यांचे सूचक संकेत
Vijay Wadettiwar (Photo Credits-Facebook)

राज्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. सध्या सुरु असलेल्या उपाययोजनांचा कितीपत परीणाम होईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. मात्र सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन परवडणारं नसल्याने कडक निर्बंध घालावे लागणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मुंबई लोकल फेऱ्या कमी

मुंबई लोकल आणि बस मध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने त्यावर नियंत्रण कसं मिळवता येईल, यावर विचार सुरु आहे. यासाठी लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबतही विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षांबाबतही नव्याने निर्णय होण्याची शक्यता

परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं असलं तरी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने परीक्षांबाबतही नव्याने निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. तसंच ऑनलाईन परीक्षांचा पर्याय किंवा तामिळनाडूप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याबाबतही विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं. (Lockdown in Mumbai: मुंबईत पुन्हा लॉकडाऊन? पहा, काय म्हणाले पालकमंत्री अस्लम शेख)

सिनेमागृह बंद

तसंच गर्दी कमी करण्यासाठी सिनेमागृहं पुन्हा एकदा बंद करावी लागतील. मंगल कार्यालयांवर लक्ष ठेवावे लागेल. बाजारपेठांमध्ये निर्बंध घालावे लागतील, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना रुग्णवाढीमुळे अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी दिले होते. त्यानंतर राज्यातील सातारा, नागपूर, अकोला, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लॉकडाऊनसाठी 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आठ दिवस राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी जनतेशी संवाद साधताना म्हटले होते.