Maharashtra Legislature Monsoon Session 2020: अवघ्या दोन दिवसांत आटोपणार राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (6 सप्टेंबर 2020) विधिमंडळ सदस्यांची ‘आरटीपीसीआर’ तपासणी केली जाईल. ज्यांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह येईल त्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे लांबणीवर पडलेले महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Legislature Monsoon Session 2020) अखेर पार पडणार आहे. मात्र, कोरोना व्हायरस संकटामुळे या अधिवेशनाचा कालावधी अवघे दोन दिवस असणार आहे. येत्या 7 आणि 8 सप्टेंबर रोजी हे अधिवेशन पार पडणार आहे. अधिवेशनादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे सर्व निकष पाळले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची एक बैठक आज (25 ऑगस्ट 2020) पार पडली. या बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने चर्चा झाली.
विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाबाबत माहिती दिली. त्यानुसार या वेळी अधिवेशनात 7 शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असणार आहे. तसेच, अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा होईल.
पुढे बोलताना सांगितले की, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानपरिषद अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा, Maharashtra Legislature Monsoon Session: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरपासून सुरु होणार)
विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे कामकाज कसे असावे याचे एक धोरण तयार करण्यात आले. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (6 सप्टेंबर 2020) विधिमंडळ सदस्यांची ‘आरटीपीसीआर’ तपासणी केली जाईल. ज्यांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह येईल त्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे.
दरम्यान, सोशल डिस्टन्सींग नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येईल. त्यामुळे आवश्यकता भासल्यास सदस्यांची आसनव्यवस्था सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येईल. तसेच प्रत्येक सदस्याला सुरक्षेचा उपाय म्हणून एक किट देण्यात येईल. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल.