आता निवडणुकीच्या आखाड्यात महाराष्ट्र क्रांती सेना; लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा लढवणार
महाराष्ट्र क्रांती सेना हा पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागांसाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा कोल्हापूर येथे करण्यात आली
मराठी समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. आज सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच जोर धरणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रांती सेना या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली होती. आता हा पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागांसाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा कोल्हापूर येथे करण्यात आली. महाराष्ट्र क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही घोषणा केली.
या दिवाळीत रायरेश्वर येथे महाराष्ट्र क्रांती सेनेची स्थापना करण्यात आली. मराठा समाजाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत या पक्षाकडून राज्यातील लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागा लढवण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात आली.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार नसतील, तर महाराष्ट्र क्रांती सेनेकडून लढवतील अशी अपेक्षा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र या नव्या पक्षाला समाजातीलच काही लोकांनी विरोध दर्शवला आहे. ‘मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाज सक्षम आहे. यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्थापनेची गरज नाही’ अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जेष्ठ पदाधिकारी बापूसाहेब शिरसाट व नानासाहेब माशेरे यांनी घेतली आहे.