Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावात दगडफेक; सीमावाद चिघळण्याची शक्यता

यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) पुन्हा एकदा नव्याने उफाळला आहे. दरम्यान, या वादाला आता काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचेही वृत्त आहे.

Glass Break | Representational image (Photo Credits: pxhere)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी वेळोवेळी केलेली वादग्रस्त विधाने आणि कर्नाटक प्रशासनानेही केलेली आगळीक. यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) पुन्हा एकदा नव्याने उफाळला आहे. दरम्यान, या वादाला आता काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचेही वृत्त आहे. कर्नाटकातील कन्नड रक्षक वेदिका ही संघटना महाराष्ट्राविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले करण्यात येत आहेत. प्रामुख्याने . बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ समाजकंटकांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक (Stone Pelting) करत तोडफोड केली.

दरम्यान, कन्नड रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा आज (मंगळवार) बेळगाव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याला कर्नाटक पोलिसांनी विरोध दर्शवला होता. तरीही ते कर्नाटकच्या दिशेने आल्याचे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे नारायण गौडा यांना कर्नाटक पोलिसांनी हिरेबागवाडी नाक्यावरच रोखले. मात्र, त्याच वेळी कन्नड रक्षक वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर जोरदार दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे. दगडफेक झालेली वाहने पुण्यातील असल्याचे प्राथमीक वृत्त आहे. (हेही वाचा, Maharashtra Karnataka Dispute: भारताचा प्रत्येक नागरिक त्याला हवं तेव्हा आणि हवं तिथे जावू शकतो, मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया)

दरम्यान, झालेल्या दगडफेकीचे महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटले आहेत. कर्नाटक सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या संयमाचा अंत पाहात आहे. आता आमचा संयम ढळत चालला आहे. त्यामुळे आता आम्हीही बेळगावकडे शिवसैनिकांसह निघणार आहोत, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी दिला आहे.