Maharashtra SSC & HSC Results 2020: 10 वी, 12 वी चे निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता; ऑगस्टपासून सुरु होणार FYJC ची ऑनलाईन प्रवेशप्रक्रीया
त्यामुळे 10 वी आणि 12 वी चे विद्यार्थी-पालक निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान लवकरच दहावी, बारावीचे निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Maharashtra 10th & 12th Results 2020: यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2020 च्या निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे 10 वी आणि 12 वी चे विद्यार्थी-पालक निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. तर यंदा 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. 12 वी चे सर्व पेपर्स झाले असले तरी कोरोनाच्या दहशतीमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे भूगोलाचे मार्क्स हे इतर विषयांच्या सरासरीने दिले जाणार आहेत अशी घोषणा शिक्षण मंडळाने केली आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत 10 वी, 12 वी चे निकाल लावण्यात येतील असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी दिले होते. त्यानुसार जुलैच्या मध्यापर्यंत 12 वीचा तर जुलै अखेरपर्यंत 10 वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात 10 वी निकाल लागतो. तर मे महिन्याच्या शेवटापर्यंत 12 वीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे पेपर तपासणीला विलंब झाल्यामुळे निकालही उशिरा लागणार आहेत. दरम्यान दहावी व बारावीच्या निकालासंदर्भात सोशल मीडियावरुन अफवा पसरवण्यात येत आहेत. त्यावर विद्यार्थी-पालकांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन शिक्षण मंडळांकडून करण्यात येत आहे. (कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रवेशपूर्व प्रक्रिया यंदा केवळ ऑनलाईन माध्यामातून; महाविद्यालयांचे ट्रेनिंग सुरू)
10 वी, 12 वी चा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?
# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
# तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही तुम्ही निकाल पाहु शकता. निकाल लागल्यानंतर ऑगस्ट महिन्यात 11 वी ची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु करुन सप्टेंबर महिन्यात वर्ग सुरू करावेत असा विचार करण्यात येत आहे. दरम्यान राज्यातील कोरोना परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. मात्र कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा 11 वीची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन माध्यमातून होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कालच स्पष्ट केले आहे.