Maharashtra Heat Wave Updates: मुंबई मध्ये उष्णतेचा पारा स्थिरावला; विदर्भात तापमानवाढ कायम

या ठिकाणी मागील विकेंडला देशातील उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले आहे.

Heat wave. Representational Image. (Photo Credits: Pixabay)

मुंबई सह महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून उष्णतेचा वाढता आलेख अंगाची काहिली करत होता. दरम्यान आज (5 एप्रिल) मुंबई सह कोकण किनारपट्टीवर हा उष्णतेचा पारा स्थिरावल्याचं चित्र असलं तरीही हवामान खात्याकडून विदर्भात तापमानवाढ कायम असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई सह कोकणात आज सकाळी ढगाळ वातावरणामध्ये दिवसाची सुरूवात झाली आहे. IMD च्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस कमाल तापमान 2-3 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. ही तापमानवाढ विदर्भाच्या काही भागांमध्ये नोंदवण्यात आली आहे.

सध्या विदर्भामध्ये तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पलिकडे गेला आहे. काल (4 एप्रिल) अकोला मध्ये महाराष्ट्र राज्यातील उच्चांकी 42.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा वाढता आहे. मराठवाडय़ातील परभणी आणि नांदेड भागात 41 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा गेला आहे. तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि जळगावमध्ये तापमान 40 अंशांच्या पार आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांत कमाल तापमान 39 अंशांच्या जवळ पोहचला आहे. कोकण विभागात मुंबई परिसर, रत्नागिरी सोबत किमान तापमानाचा पारा सरासरीच्या जवळ आहे.

के एस होसाळीकर ट्वीट

विदर्भा मध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 40 अंशाच्या जवळ आहे. या ठिकाणी मागील विकेंडला देशातील उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले आहे. तर मुंबई मध्ये दुपारनंतर वार्‍याचा वेग वाढल्याने उन्हाची झळ कमी बसत असल्याचं सांगण्यात आले आहे.